Monday, 7 November 2011

आणखी सालं काय हवं?


काल कार्तिकी एकादशी झाली. कोकणातले वारकरी पाऊस आणि भाताच्या शेतीमुळे परंपरेने आषाढीपेक्षा कार्तिकीला पंढरीला जातात. मला माहीत आहे तोवर माझी आजी नियमित कार्तिकी करायची. ती थकल्यावर आई वडील नेमाने कार्तिकी करू लागले. पण एकादशीच्या जत्रेची गर्दी झेपत नाही म्हणून दिवाळीच्या आगेमागे त्यांची कार्तिकी साजरी होऊ लागली. चारेक वर्षांपूर्वी पप्पांना पंढरपूरलाच माइल्ड हार्ट अटॅक आला. तेव्हापासून गेली तीन वर्षं आम्ही, म्हणजे मी आणि मुक्ता, दोघे कार्तिकीला जातोय.

दोन वर्षांपूर्वी आमची पहिली कार्तिकी होती. रिझर्वेशन होतं, पण ठाण्याला रेल्वेरुळांवर पाण्याच्या पायपांचा पूल पडल्याने अचानक सगळ्या ट्रेन रद्द झाल्या होत्या. म्हणून सकाळच एस्टीने जायचं ठरवलं. त्यामुळे थेट पंढरपूरला न जाता देहू आळंदी करायची ठरवली. आमचा रूद्र सोबत होताच. पहिल्यांदाच असं ओळीने देहू आळंदी आणि पंढरी करणार होतो. चार दिवस खूप आनंदात गेले. काय ठरवलं काहीच माहीत नाही. पण या चार दिवसांत नोकरी सोडायचा निर्णय झाला आपोआप. महाराष्ट्र टाइम्समधे मानाच्या मेट्रो एडिटर पदावर काम करत होतो. कॉलम सुरू होता. तसं काहीच कमी नव्हतं. पण मनासारखं काम करता येत नव्हतं. परतून घरी आलो. सकाळी नाश्त्याला बसल्यावर बायकोला हळूच सांगितलं. आज नोकरीचा राजीनामा देतोय. कंटाळा आलाय. ती लगेच हो म्हणाली. ऑफिसात आलो. रोजची कामं केली. संपादकांशी बोललो. राजीनामा लिहून दिला. खांद्यावरचं वजन कमी झाल्यासारखं वाटलं.

आजही त्या निर्णयाचा खूप आनंद आहे. नोकरी सोडली तेव्हा पुन्हा नोकरी करायची नाही असं ठरवलं होतं. काय करायचं याची मोठी यादी बनवली होती. पण ती कामं करता येतील अशी नोकरी मिळाली तर चांगलंच होतं. अशावेळेस माझा जुना दोस्त रवी तिवारी देवासारखा धावून आला. मी मराठीच्या बातम्यांचा कार्यकारी संपादक म्हणून जॉइन झालो. त्याला पावणेदोन वर्षं झाली. आजवरच्या करियरमधली आणि वेगवेगळ्या नोक-यांतली ही सगळ्यात आनंदाची वर्षं होती. खूप उपद्व्याप करता आले. त्यातला प्रबोधनकार डॉट कॉमचा उपद्व्याप यशस्वी झाला. मी मराठीच्या बातम्यांसाठी काही चांगलं करता आलं. नवशक्तितला कॉलम आणि ब्लॉग नियमित लिहिला गेला. पण त्याशिवायचे जवळपास सगळे उपद्व्याप आतबट्ट्याचे ठरले. पण या सगळ्या उपद्व्यापांनी खूप काही दिलं. खूप खूप अनुभव दिले. अनेक नवे मित्र भेटले. जुने मित्रं रिफ्रेश झाले. घराला खूप वेळ देता आला. आई वडिलांची इच्छा म्हणून गावी एक छोटं घर बांधलं. अनेक अंगांनी विकसित करणारा अनुभव होता ही दोन वर्षं. मी मराठी ऑफिसात गीता, संतोष, दीपक, भाग्यश्री, नीतिन, शिल्पा, शशी, नेहा अशी कितीतरी आपली माणसं भेटली. रवी तिवारी, श्रीरंग गायकवाड, अजय कुमार, नरेंद्र बंडबे, प्रेम शुक्ला, इम्तियाज खलिल अशा जीवाभावाच्या सोबत्यांसोबत घालवलेले तास्नंतास समृद्ध करून गेले. या सगळ्याचं श्रेय रवी तिवारीलाच द्यायला हवं. तो नसता तर काहीच झालं नसतं.

सगळं छानच सुरू होतं. कंपनीत थोड्या आर्थिक अडचणी होत्या. पण ते माझ्यासाठी फारसं काही चिंतेचं नव्हतं. अशावेळेस अचानक नवशक्तिचे संपादक विनायक पात्रुडकर यांचा फोन आला. मी ट्रेनमधे बसलो होतो. मी पुढारीत चाललोय, तुम्हाला माहीत असेलच, त्यांनी विचारलं. मला खरंच माहीत नव्हतं. तुम्ही माझ्याजागी नवशक्तित यायला इच्छुक आहात का. असेल तर आपण प्रयत्न करूया. मी एक दिवस मागून घेतला. ऑफिसात थोड्या अडचणी सुरू असल्यामुळे रवीशी बोलणं आवश्यक होतं. त्यानंतर मी पात्रुडकरांना फोन करून हो कळवलं. भेटीगाठी झाल्या. मधे महिनाभर तरी निघून गेला. त्या काळात अचानक माझ्याकडे आणखी दोन ऑफर आल्या होत्या. पुन्हा अचानकच नवशक्तितून फोन आला. आमचं फायनल झालंय. पैशांचं बोलण्यासाठी या. चांगला पगार दिला. मला ऑफर लेटर मिळालं. मी इथला राजीनामा दिला.

आज संध्याकाळपासून मी नवशक्तिचा संपादक म्हणून रुजू होतोय. ७७ वर्षं जुना पेपर. महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या जडणघडणीवर स्वतःचं योगदान देणारा पेपर. तिथे माझ्यासारखा अवघ्या ३४ वर्षांचा पोरगा संपादक बनणार आहे. हे अद्भूत आहे. अनेक मोठमोठे लोक या खुर्चीवर बसले होते. मोठी जबाबदारी आहे. माझे खांदे तेवढे मजबूत नाहीत. पण यापैकी कशाचाही विचार न करता नवं आव्हान स्वीकारण्यासाठी चाललो आहे. सगळा पेपर हातात मिळणार आणि नवी माणसं भेटणार याचाच आनंद आहे. आजवर खूप नोक-यांची धावपळ केली. पण आता इथे काही वर्षं थांबायचंय. मनासारखं काम करायचंय. लोक वर्षानुवर्षं लक्षात ठेवतील असं काहीतरी करून दाखवायचंय. त्यासाठी तुमच्या सगळ्या मित्रांचं पाठबळ हवंय. त्याशिवाय हे शक्य नाही.

नवशक्तित चाललोय म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर भाऊ पाध्ये येतोय. त्याच्यावरच्या ब्लॉगवर त्याचा एक फोटो आहे. पाय टेबलावर टाकून नवशक्तिच्या ऑफिसात बसलेला भाऊ. भाऊ आपला खूप सगळ्यात आवडता लेखक. त्याने जगायचं नवं भान दिलं. लिहायचा नवा हात दिला. तो जिथे अकरा वर्षं काम करत होतो. तिथे संपादक बनून चाललोय. आणखी सालं काय हवं?

Wednesday, 26 October 2011

पैसा सिर्फ पैसा नही है


आज लक्ष्मीपूजन. दिवाळीतला हा दिवस मला लहानपणापासून रिकामा रिकामा वाटत राहिला. म्हणजे नरकचतुर्दशीला कारटं फोडणं. पहिली आंघोळ. पाडव्याला साल मुबारक. भाऊबीजेला ओवाळणं ओवाळणी. पण लक्ष्मीपूजनाला आमच्या घरात काही घडत नसायचं. घरात लश्र्मीची पूजा झालेली मला तरी आठवत नाही. कदाचित घरात पुजण्याइतकी लक्ष्मी नसल्यामुळे असेलही कदाचित. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या काही आठवणी माझ्याकडे तरी नाहीत.

आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला भलतीच गोष्ट आठवली. एक जाहिरात. आयएनजी लाईफ इन्शुरन्सची. 'पैसा सिर्फ पैसा नही हैं.' या जाहिरातीशी माझ्या एका कॉलमाच्या आठवणीही जोडलेल्या आहेत. मुंबई टाइम्समधे मीच माझा एक कॉलम सुरू केला होता. 'अॅड्यात्म' नावाचा. नव्या पानांमधे काहीतरी मोटिवेशनल मजकूर हवा होता. म्हटलं आपणच लिहूया. ही कल्पना बरेच दिवस डोक्यात होती. सारंग दर्शने फार पूर्वी काही दिवस मुंटामधेच काही दिवस ताओ ताऊ या टोपणनावाने छोटे छोटे तुकडे लिहायचे. ते डोक्यात होतं. पण हे स्पिकिंग ट्री पेक्षाही वेगळं हवं होतं. अॅड्यात्मला पर्याय नव्हता.

कधीतरी असाच अध्यात्म या शब्दाशी अध्यातमध्यात... अर्ध्यात्म... असं मनातल्या मनात खेळता खेळता अॅड्यात्म या शब्दापर्यंत आलो. नवा शब्द भेटला. मजाच आली. नागडं होऊन युरेका युरेका म्हणत नाचणंच बाकी होतं. टीव्हीवरच्या जाहिरातींनी आजवर आपल्याला खूप काही दिलंय. नवे विचार. वेगळ्या मांडण्या. बरंच काही. टीव्हीवरच्या बातम्या कार्यक्रमांपेक्षा जाहिरातीच आवडीने बघत आलोय. अशा जाहिरातींविषयी, त्याच्या टॅगलाईन पंचलाईनींविषयी सांगताना अध्यात्म मांडता येईल का? हे शोधायचं होतं. म्हटलं मजा येईल. करून तर बघुया. लोकांचा रिस्पॉन्स नाही आला तर करू बंद. त्यात काय.

Wednesday, 19 October 2011

वेड्यांचा सत्कार होतो आहे


अचानक ठरवलं आणि परवा चौदा तारखेला अमरावती एक्स्प्रेस पकडली. पंधराला सकाळी अमरावतीला पोहोचलो. अमरावती, मला आवडलेलं खूप छान शहर. निमित्त होतं चंदूभाऊंचा, चंद्रकांत वानखडेंचा एकसष्टीनिमित्त सत्कार. शहरातला सगळ्यात मोठा हॉल तुडुंब भरला होता. अख्ख्या विदर्भातून साधे साधे लोक आले होते. त्यात कार्यकर्तेच खूप. सगळ्या पक्षांचे, वेगवेगळ्या संघटनांचे. दिवाकर रावते आणि अनंत दीक्षित यांची भाषण सोडून कार्यक्रम अप्रतिम झाला. मायाताई, अमर हबीब, बच्चू कडू आणि चंदूभाऊ अशा सगळ्यांनीच छान भाषणं झाली. जीव लावण्याचाच तो सोहळा होता. समृद्ध करणारा दिवस होता तो.

उद्धव ठाकरे येणार होते. ते येऊ शकले नाहीत. कारण माहीत नाही. पण बरं झालं ते आले नाहीत ते. नाहीतर तुडूंब गर्दीचं श्रेय त्यांना गेलं असतं. चंदूभाऊंसाठी अबालवृद्धांची गर्दी हेवा करणारी होती. आज त्यांच्याकडे रुढार्थाने कोणतंही प्रतिष्ठेचं पद नाही. तरीही लोक आले. लोहचुंबकाने आकर्षून घ्यावं, तशी लोकांची रीघ होती. चंदूभाऊंच्या कृतार्थ आयुष्याची ती पावती होती. एका भणंग कार्यकर्त्यासाठी आणि ध्येयनिष्ठ पत्रकाराला आणखी पाहिजे तरी काय?

Wednesday, 21 September 2011

महिलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्रबोधनकार


आपल्या सगळ्यांची वेबसाईट prabodhankar.com च्या उद्घाटनाला या शनिवारी प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त एक वर्ष पूर्ण झालं. आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय डॉक्युमेंटेशनचं हे मोठं काम पूर्ण झालं नसतं. त्यामुळे आता एक वर्ष पूर्ण होताना आपल्याविषयी कृतज्ञता करायला हवीय.

गेल्या वर्षभरात आपल्या वेबसाईटला ५३ देशांमधून जवळपास अडीच लाख लोकांनी भेट दिली. त्यात साठ टक्के लोक पहिल्या महिनाभरात आले होते. इतक्या लोकांपर्यंत प्रबोधनकारांची झलक पोहचवू शकलो, यात खूपच आनंद आहे. गेल्या वर्षी विशेषतः हर्षल प्रधान यांच्यामुळे प्रबोधनकारांविषयी विविध वृत्तपत्रांत छापून आले आणि टीव्हीनेदेखील त्याची सविस्तर दखल घेतली. यातून प्रबोधनकारांची किंवा त्यांच्याविषयी पुस्तक आहे का, अशी विचारणा आता मुंबई आणि पुण्यातील पुस्तकांच्या दुकानात नव्याने होऊ लागली आहे.गांधर्ववेद प्रकाशनाने महाराष्ट्र निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अरूण टिकेकर यांच्या संपादकत्वाखाली महाराष्ट्राचे निर्माते अशी पुस्तकांची सिरीज काढायची घोषणा केली होती. तेव्हा त्यात प्रबोधनकारांवरील पुस्तकाचा समावेश नव्हता. पण आपल्या वेबसाईटच्या उद्घाटनानंतर त्यांनी घाईगडबडीने महावीर मुळे (काकडवाडी, सांगली) यांच्याकडून पुस्तक लिहून घेतले आहे. राज्य सरकारच्यालोकराज्यया मासिकाच्या वाचन विशेषांकात आवर्जून प्रबोधनकारांवर लेख समाविष्ट करण्यात आला होता. मनसेने प्रबोधनकारांच्या नावाने बोरिवलीत ग्रंथालयाचं काम सुरू केलंय.

Saturday, 10 September 2011

हे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना?


आम्ही अस्सल मुंबईकर. पण शहरातले सार्वजनिक गणपती बघायला फिरायची पद्धत आमच्या घरात नाही. कारण घरातच गणपती. घरचा गणपती गेला तरी वाडीतला सार्वजनिक गणपती असायचा. त्याची रोजची पूजा, नैवेद्य, आरती हे आमच्या घरातून व्हायचं. त्यामुळे अकरा दिवस घरातच लगबग असायची. आम्ही घरातले सगळे मुंबईभर फिरायचो ते देवी बघायला. आजही जातो. 

त्यामुळे लालबागचा राजा, गणेशगल्ली याविषयी ऐकलं भरपूर होतं. पण प्रत्यक्षात दर्शनाला गेलो ते टीव्हीत पत्रकारिता सुरू केल्यावर. ईटीव्हीत असताना गणपतीत दिवसभर घरी राहता यावं म्हणून मुद्दामून नाईट शिफ्ट मागून घ्यायचो. तेव्हाच म्हणजे मला वाटतं २००० किंवा २००१ साली पहिल्यांदा राजा आणि गणेशगल्लीच्या दर्शनाला कामाचा भाग म्हणून गेलो. मी पहिल्यांदा राजाकडे गेलो तेव्हा दर्शनासाठी रांग नव्हतीच. जी होती ती नवसाचीच रांग. गणेशगल्लीत मात्र देखावा बघण्यासाठी तुडुंब गर्दी होती. पण हळूहळू सगळंच बदलत गेलं. लालबागचा राजा गर्दीचा राजा बनला. साधारण २००५ आणि ०६ ला गर्दीत चेंगरत दर्शनाला जावं लागलं होतं. त्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीत लांबून दर्शन घेण्याचा सोपा मार्ग निवडला. दोनेक वर्षांपूर्वी दर्शनाला गेलो आणि दर्शन न करताच परत आलो होतो. हे सगळे बदल डोळ्यासमोर घडताना बघत होते. माझे मीडियातले मित्रच हे बदल घडवण्यात महत्त्वाचा हातभार लावत होते. तेही जवळून बघत होतो.

Saturday, 3 September 2011

बाप्पा बदलले, आपण कधी बदलणार?


आठवड्याचा कॉलम गणपतीबाप्पावर लिहायचं हे नक्कीच होतं. कारण आसपासच्या वातावरणाला टाळून काही लिहावं असं मला नाही वाटत. गणपती हा आदर्श नेत्याचं प्रतीक कसा आहे, हे लोकपालच्या पार्श्वभूमीवर लिहायला बसलो होतो. पण लिहिता लिहिता भलतच लिहिलं. सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी थोडा सामाजिक अंगाने मांडणी करायचा प्रयत्न केलाय. पण तो तोकडा आहे. कारण ती फक्त वरवरची निरीक्षणं आहेत. त्याहीपेक्षा अधिक अभ्यासाने याकडे पाहायला हवंय. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या ऋषितुल्य विद्वानाने देवतांमधले बदल कसे घडले हे सर्वसामान्य मराठी माणसाला समजावून सांगितलं. ते इतिहासात जसं शोधता येतं. तसं काही वर्तमानात शोध करता येऊ शकेल का, या अंगाने हा प्रयत्न झालाय. मला वाटतं बाप्पा बदलताहेत. पण त्याचे भक्त आपण बदलतोय का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

Monday, 29 August 2011

इथे गांधीजी भेटतात अधूनमधून


अण्णा किती यशस्वी झाले. त्यांचं जनलोकपाल खरंच येणार का. त्यामुळे भ्रष्टाचार खरंच संपेल का. हे सारे प्रश्न माझ्यासाठी तरी फिजूल आहेत. खरं सांगायचं तर मला अण्णांचं कौतुक फारसं नव्हतंच. आताही इतरांइतकं नाही. तरीही मला त्यांचं आंदोलन महत्त्वाचं वाटलं. ज्यांना स्वतःशिवाय काहीच माहीत नव्हतं असे लाखो तरुण वंदे मातरम म्हणत रस्त्यावर उतरले. मला वाटतं सगळं भरून पावलं. मी गेली काही वर्षं राजकारणी, प्रशासनाची यंत्रणा तसा जवळून बघतोय. दिल्लीतही दीडेक वर्षं राहिलोय. तो अनुभव जमेस धरून मला वाटतं या आंदोलनानं खूप काही मिळवलंय. 

त्यामुळेच मी थोडा चक्रावलोयसुद्धा. आपण सगळे ज्याला फारसं महत्त्वही देत नव्हतो, असा एक माणूस देशात एवढी जागृती घडवतो. आपल्या डोळ्यासमोर सगळं घडतं, पण आपल्याला कळतही नाही. हे धक्कादायक होतं आणि आहे. त्यातून मी माझ्यापरीनं अण्णांच्या चमत्काराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा फक्त त्या शोधातला एक छोटासा कोन आहे. पण महत्त्वाचा आहे. मी त्यांच्यातला गांधीजी शोधायचा प्रयत्न केला. तो लेख पुढे कटपेस्ट करतोय. 

Tuesday, 23 August 2011

मीडियाचं काय चुकलं?


अण्णा हजारे आगे बढो. वंदे मातरम. भारतमाता की जय. अशा आरोळ्या आमच्या घराबाहेर ऐकू आल्या. आमच्या वाडीत असे आवाज येतील असं वाटलं नव्हतो. कारण वाडीत जवळपास सगळ्यांना ओळखतो. इथे अण्णा कोणाला भावला? आमच्या वाडीतलीच पंधरा वीस पोरं. कुणीही बारा तेरा वर्षांपेक्षा जास्त नाही. मी तोंडात बोट घालायचंच बाकी होतं.

रुद्र. माझा पाच वर्षांचा मुलगा. पहिलीत आहे. अजून स्वतःचं ढुंगण धुता येत नाही. परवा खेळता खेळता भारतमाता की जय ओरडला. अण्णा हजारे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, हे ऐकून मला धक्काच बसला. अण्णा हजारेंचं आंदोलन सुरूय तेव्हापासून त्याचे भाईआजोबा रोज न्यूज चॅनल लावून बसतात. त्याचा परिणाम असावा. तुला अण्णा हजारे माहिती आहेत का, मी विचारलं. रुद्र हो म्हणाला. कसे दिसतात, मला अजूनही शंका होती. टोपी घालतात, तो म्हणाला. कोणत्या रंगाची, माझा प्रश्न. सफेद त्याचं उत्तर. माझा पुढचा प्रश्न येण्याआधी त्याने टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारे अण्णा दाखवले.

हे घडायच्या आधी लिहिलेला एक लेख ब्ल़ॉगवर टाकतोय.

Saturday, 6 August 2011

माझे वडील भारताचा द्वेष का करतात?


आंतरराष्ट्रीय वगैरे विषयांवर मी फारसं लिहित नाही. मला त्यातलं काही कळतही नाही. राष्ट्रीय विषयांच्या भानगडीतही फारसा पडत नाही. आपल्या आसपासच्या विषयांवर आपण जमिनीवरचं वास्तव स्वतः पडताळून पाहू शकतो. तसं आंतरराष्ट्रीय विषयांवर करता येत नाही. रोजच्या पेपरांतल्या बातम्या वाचल्या तरी बहुदा त्याची एकच बाजू आपल्यासमोर येत असते. पण भारत पाकिस्तान विषयावर मी बहुदा पहिल्यांदाच लिहिलं. त्याचं कारण होतं आतिश तासिर. मी त्याच्याविषयी पूर्वीही वाचलं होतं. त्याचं लाईफ आपल्याला खूप आवडलं. त्याचं लेखनही. आता त्याच्या एका लेखावर मी लिहिलंय. त्याचा लेखच मराठीत अनुवाद करून टाकलाय. बघा वाचून. 

काही लोकांचं जगणं हे कादंबरीच असते. आतिश तासिरचं तसंच काहीतरी. त्याच्या आई इंग्रजीतल्या ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका तवलीन सिंग. वडील पाकिस्तानातले ज्येष्ठ राजकीय नेते सलमान तासिर. आई भारतातली तर वडील पाकिस्तानातले. पण आतिशचा जन्म लंडनचा. प्राथमिक शिक्षण आईबरोबर दिल्लीत. पण लेखक पत्रकार म्हणून करियर इंग्लंडमधलं. त्याने सादत हसन मंटोच्या कथा उर्दूतून इंग्रजीत आणल्यात. पुढे टाइम मॅगझिनमधलं त्याचं लिखाण गाजलं. त्याची इंग्लंडच्या राजघराण्यातली गर्लफ्रेण्डही चर्चेत होती. पण त्या सगळ्यापेक्षा त्याचं पुस्तक गाजलं. स्ट्रेंजर टू हिस्टरीः अ सन्स जर्नी टू इस्लामिक लँड्स. त्यात पाकिस्तानात राहणा-या त्याच्या वडिलांच्या शोधाचा प्रवास होता. त्याहीपेक्षा त्यात होता तो या शोधादरम्यान त्याच्या स्वतःच्या मानसिकतेचाही प्रवास.

Wednesday, 3 August 2011

मनसे + भाजप = ?


सध्या राज ठाकरे गुजरातेत पोहोचलेत. नरेंद्र मोदींचे ते सरकारी पाहुणेही आहेत. मनसे आणि भाजप या नात्यावर जितकं लिहावं तितकं कमीच. एक लेख दोन आठवड्यांपूर्वीचा.

कधी, कुठे आणि कसं बातम्यांत राहायचं ते राज ठाकरेंना बरोबर कळतं. आणि त्यातून शिवसेनेची खोडी काढायची असेल तर मग पाहायलाच नको. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी केलेला विकास समजून घेण्यासाठी आखलेला आगामी दौरा असो, किंवा नाशकात राजनाथ सिंग यांच्याबरोबर एका व्यासपीठावरून भाषण देणं असो. गुजरातच्या दौ-याच्या बातम्या ब-याच बनत आहेत. पण राजनाथ सिंग यांच्यासोबतचा कार्यक्रम एकूण राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

Tuesday, 26 July 2011

दिवस वाढदिवसांचे


वसुंधराराजे शिंदे राजस्थानच्या मुख्यमंत्री असताना एका देवीच्या चेह-यात त्यांचा चेहरा टाकून पूजा झाली होती. त्यावरून मोठं वादळ उठलं होतं. त्याला टाइम्स ऑफ इंडियाने एक मस्त शब्द वापरला होता. फोटोशॉप पॉलिटिक्स. हे फोटोशॉप पॉलिटिक्स खरं तर आपल्या नाक्यानाक्यावर आहे. होर्डिंग आणि पोस्टरच्या रुपानं. सध्या मुंबईत महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. पोस्टर बघून कोणत्या वॉर्डात कोण इच्छुक आहेत, याचा अंदाज मिळू शकतो. 

तसंच वाढदिवसांचंही. वाढदिवसांचा धुरळा बघून कोणत्या नेत्याची चलती आहे, याचा अंदाज येतो. उद्या उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि चार दिवसांपूर्वी. यावर्षी बॉम्बस्फोटांमुळे होर्डिंग पोस्टर लागले नाहीत. पण गेल्यावर्षी अजितदादांच्या वाढदिवसाचा मोठा दणका उडाला होता. तेव्हा ही उपमुख्यमंत्रीपदाची तयारी असल्याचा लेख मी नवशक्तीत लिहिला होता. ते काही महिन्यांतच खरं ठरलं. आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांची विकेट पडली. पृथ्वीराज आले आणि त्यांच्याबरोबर अजितदादाही. जवळपास वर्षापूर्वी लिहिलेला लेख इथे कटपेस्ट करतोय. 

Sunday, 24 July 2011

आयडियल इंटरनॅशनल २०११


शिकागो बीएमएम कन्वेंशन विशेषांक

भारताबाहेर पसरलेली मराठी माणसं सध्या शिकागोत जमलीत. २१ ते २३ जुलैदरम्यान तिथे बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन म्हणजे बीएमएम कन्वेंशन सुरू आहे. जगभरातल्या मराठी कर्तृत्वाचे आजच्या बदलणा-या महाराष्ट्राशी सूर जुळावेत या हेतूने दादरच्या आयडियल पुस्तक त्रिवेणीच्या मंदार नेरूरकर यांनी आयडियल इंटरनॅशनल २०११ या विशेषांकाची निर्मिती केलीय. मी त्याची सगळी संपादकीय जबाबदारी घेतली होती.

भारताबाहेरच्या मराठी माणसांपर्यंत शक्यतो न पोहोचणारे विषय,  माणसं आणि लेखक यात आहेत. अंक खूप चांगला झालाय. तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी अपेक्षा आहे. शिकागो कन्वेशनमधे ग्रंथालीच्या स्टॉलवर हा अंक विनामूल्य उपलब्ध आहे. त्यातल्या लेखांची ही यादी.

Saturday, 23 July 2011

टिळक, माय फादर


माझी जीवनगाथा या आत्मचरित्रातून मला प्रबोधनकार भेटले. मला एक खजिनाच भेटला. त्यात प्रबोधनकारांनी आपल्या अनेक दोस्तांचीही गाठ घालून दिलीय. श्रीधरपंत टिळकही त्यातलेच एक. लोकमान्यांचा हा बंडखोर मुलगा अवघ्या वयाच्या बत्तिसाव्या वर्षी ट्रेनखाली आत्महत्या करतो, हे वाचून धक्का बसला. यात वैचारिक, भावनिक मोठाच संघर्ष. पण कधी त्यावर कुणी कादंबरी लिहिली नाही, कधी कुणी नाटक लिहिलं नाही. का?

मटाच्या वेबसाईटमधे आम्ही सगळ्यांनी बहुदा १ ऑगस्ट २००७ ग्लोबल टिळक हे सेग्मेंट केलं होतं. तेव्हा हरिलाल गांधींवरच्या गांधी, माय फादर नावाचा सिनेमा येऊ घातला होता. त्या धर्तीवर आम्ही श्रीधरपंतांविषयी टिळक, माय फादर या नावाने काही लेख मांडले होते. त्याला जोरदार रिस्पॉन्स मिळाला. त्यात मी श्रीधरपंतांची ओळख करून देणारा लेख लिहिला होता. 'ओळख सिंहाच्या छाव्याची'. तो कटपेस्ट करतोय. आज टिळकांची जयंती आहे. त्यानिमित्त.

Thursday, 21 July 2011

विनोद कांबळीची जात


कुठे कार्यक्रमाला गेलं की ओळखीचे भेटतात. मग ते ओळखीचे त्यांच्या ओळखीच्यांशी ओळख करून देतात. मग समोरचे सांगतात, मी वाचलंय तुमचं. आता ब्लॉग, फेसबुकामुळे सगळ्यांची आठवण लगेच जुळते. त्यांना आठवणा-या लेखात गुढीपाडव्यावरचा आणि माधुरीवरचा लेख असतात. आता नेटवर आणि पेपरात सगळीकडेच फोटो असतो. पण आधी तुम्ही तर खूपच तरुण आहात, ही प्रतिक्रिया नेहमी असायची. अशा भेटणा-यात पत्रकारिता, समाजकारणाशी संबंध नसलेल्या नोकरपेशा माणसं आजही अँड्यात्म या कॉलमाची आठवण काढतात. त्यासोबत हगण्यावरचा लेख हसत हसत सांगितला जातो. त्यात कुणी पत्रकारितेतलं असेल तर मग कणकवलीतलं रिपोर्टिंग नाहीतर राज ठाकरेंवरचं लिखाण आठवतं. आणि चळवळीतल असेल तर मग एक लेख वारंवार आठवणीने सांगितला जातो, तो विनोद कांबळीवरचा.

सच का सामना या वादग्रस्त टीव्ही रिऍलिटी शो मधे तेव्हा विनोद कांबळी आला होता. आपल्यावर जातीमुळे अन्याय झालाय, असं त्याने म्हटलं होतं. माझ्या विंडो सीट नावाच्या कॉलमात मी त्यावर लेख लिहिला होता, जेंटलमेन्स गेम नावाचा. कांबळी हे आडनाव भंडा-यांमधलं, मग त्यासाठी विनोद नक्की दलित ना, याचा शोध सर्वात आधी घ्यावा लागला. ज्येष्ठ क्रीडापत्रकार शरद कद्रेकरांनी ते कन्फर्म केलं. मग आतापर्यंत कोण कोण दलित भारतीय संघातून कसोटीपटू झालेत त्याचा शोध घ्यायचा होता. या अंगाने बोरिया मुजुमदारांचं थोडं फार वाचलं होतं. म्हणून त्यांचा ईमेल आयडी शोधून काढला. मेल केला. त्यांचा लगेच रिस्पॉन्स आला. आजवर विनोद आणि डो़डा गणेश हे दोनच दलित कसोटीपटू झालेत, हे त्यांनी सांगितलं. त्यांची मेलमधे हिंदू दलित अशा शब्द वापरला होता. त्याचा अर्थ नंतर कळला कारण ख्रिश्चन दलितांपैकी चंदू बोर्डे आणि विजय हजारे यांनी भारतीय क्रिकेटवर आपला ठसा उमटवलाय. आमदार कपिल पाटील यांनी ही माहिती नंतर दिली.

Tuesday, 19 July 2011

बहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही

२० ते २२ मे रोजी पुणे शहराजवळ वाघोलीत बहुजन संत साहित्य संमेलन होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला त्याचं वक्ता म्हणून निमंत्रण होतं. २१ तारखेला शनिवारी सकाळी प्रसारमाध्यमांतील बहुजन संत साहित्याची स्थिती या विषयावरच्या परिसंवादात मला बोलायचं होतं. विषय आवडीचा होताच. पण त्यावर बोलायचं म्हणून थोडा अभ्यास करावा म्हणून दुकानांत पुस्तकं बघायला गेलो. तर संत आणि बहुजनवाद या विषयावरची पुस्तकं मिळाली ती संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, बामसेफ याचीच. त्यात एककल्लीपणा तर होताच पण द्वेष ठासून भरलेला होता. संत आणि द्वेष एकत्र? ते पटण्यासारखंच नव्हतं. टाळकंच फिरलं.

त्या फिरलेल्या टाळक्यानेच भाषणाला गेलो. जे पटतं ते बोलावं. मनात पाप नाही तर लपवाछपवी कशाला? म्हणून जे काही वाटत होतं ते थोडं स्पष्टच बोललो. मी काही पट्टीचा भाषण करणारा नाही. जसं आपण रोज बोलतो. तसंच लिहावं आणि सभेतही बोलावं असं मला वाटतं. भाषण चांगलं झालं म्हणे. तिथल्या श्रोत्यांनी जोरदार कौतूक केलं. व्यासपीठावर माझ्यासह हरी नरके, सांगलीचे डॉ. बाबूराव गुरव, गुजरातचे जयंतीभाई होते. सगळ्यांनी कौतूक केलं. नरके सरांचं भाषण माझ्यानंतर झालं. त्यात त्यांनी माझा उल्लेख तरुण विचारवंत असा केला. बरं वाटलं.

भाषण सुरू असताना एक गंमत होत होती. प्रेक्षकांमधले एक मान्यवर मला सतत थांबवून प्रश्न विचारत होते. मी ब्राम्हण आहे आणि ब्राम्हणांची बाजू घेतो आहे, असा त्यांच्या प्रश्नाचा रोख होता. ते विदर्भाकडचे होते. त्यामुळे परब म्हणजे मराठा हे मुंबई कोकणात स्पष्ट असणारं समीकरण त्यांना माहीत नव्हतंच. या सगळ्याची खूप गंमत वाटली. आपण मोठ्या शहरात जन्मलो आणि जातीचे संस्कार आपल्यावर झाले नाहीत, हे केवढं मोठं नशीब असं वाटलं.

Monday, 18 July 2011

गुरुदक्षिणा ऑनलाईन

मलाही आजकाल गुरुपौर्णिमेचे एसेमेस येतात. काहीजण फोन करतात. मी काही वर्ष पत्रकारिता शिकवतोय. त्याचे विद्यार्थी त्यात बहुसंख्येने असतात. पण इतरही काही माझे थोडे ज्युनियर मित्रही असतात. आश्चर्यच वाटतं. थोडा इगो सुखावलाही जातो. पण ते मनावर घेण्याचा काही प्रश्नच नसतो. कारण कोणी आपल्याला गुरू म्हणावं इतके आपण मोठे नाही, हे मला माझ्यासाठी सूर्यप्रकाशाहून क्लिअर आहे.

गुरूकडे बघायचे दोन दृष्टिकोन मला वाटतात. एक जीवनाला दिशा देणारा तो गुरू. उगाच सगळ्यांना गुरू म्हणून नये. पण दुसरीकडे दत्तात्रेयांसारखे चोवीस गुरू असण्याचा उदार दृष्टिकोनही आहेच. मी ज्यांच्याकडून काहीन्काही शिकतो. ते कृतज्ञतापूर्वक माझे गुरूच असतात. कृतज्ञतेत कृपणता कशाला. मला वाटतं दोन्ही दृष्टिकोन महत्त्वाचे वाटतात. वाटल्यास त्यांना मोठे गुरू आणि छोटे गुरू म्हणू. पण ते सगळे गुरूच.

याच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर पंचवर्गीय भिक्खूंना पहिलं प्रवचन दिलं होतं. तोच धम्मचक्रप्रवर्तनदिन आपण हजारो वर्ष गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतोय. आद्य शंकराचार्यांच्या प्रभावामुळे अनेक बौद्ध परंपरांना वैदिक रूप मिळालं. त्यात ही व्यासपौर्णिमाही होती. आता यावर अनेक मतं मतांतरं असू शकतील. पण मला इथे भांडावसं वाटत नाही. कोळणीच्या घरी जन्माला येऊन वेदांना शिस्त लावणारे महर्षि वेदव्यासही मला पूज्यच. भगवान बुद्धही आणि आद्य शंकराचार्यही. अशा जगाला वळण लावणा-यांची आठवण काढण्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करायला हवी. त्याच भूमिकेतून या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साने गुरुजी आणि त्यांच्यावरच्या वेबसाईटवर लिहिलंय. मूळ लेख इथे कटपेस्ट.

Thursday, 7 July 2011

वाचायलाच हवं असं ‘आकलन’

माझे ज्येष्ठ मित्र अमर हबीब यांचं नवं पुस्तक आलंय. आकलन हा त्यांचा लेखसंग्रह आहे. त्याच्याविषयी नवशक्ति तसंच कृषीवल इथल्या दोन्ही कॉलमांमधे लिहिलंय. हे पुस्तक तुमच्यापर्यंत सहज पोहचू शकतं. अमरजींनी त्यांच्या पुस्तकांसाठी एक अफलातून विक्रीतंत्र विकसित केलंय. आपण ९४२२९३१९८६ या मोबाईलवर किंवा habib.amar@gmail.com या ईमेलवर स्वतःचा पत्ता कळवायचा. पुस्तक त्या पत्त्यावर कुरियर केलं जातं. आणि पुस्तक आवडलं तरच पैसे पाठवायचे. असं करणा-यांना डिस्काऊंटही आहे. दीडशे रुपयांचं पुस्तक फक्त शंभर रुपयांत. कृषीवलमधल्या प्रीझम या कॉलमातला लेख इथे कटपेस्ट.

Monday, 4 July 2011

उद्धवस्त ढिगा-याखाली


परवा सुनील पवार भेटायला ऑफिसात आला होता. आम्ही एकमेकांना ओळखतो त्याला बारा तरी वर्षं झाली. तेव्हा तो सी न्यूजमधे आमच्या बरोबर कॅमेरा अटेण्डण्ट होता. पुढे ई टीव्हीतही एकत्र होतो. आता तो आयबीएन लोकमतमधे कॅमेरामन बनलाय. सुनील एवढुसा. त्यात बारीक. आवाजही तसाच बारका. पण जीवाला जीव लावणारा जिवाभावाचा दोस्त. वर्ष वर्ष भेटत नसू पण जिव्हाळा तसाच.

सुनीलशी भरपूर गप्पा झाल्या. सी न्यूजमधे व्हीएचएस म्हणजे लग्नाचा कॅमेरा घेऊन लोकल ट्रेनमधून केलेलं अपडाऊन आठवलं. इतक्या वर्षातले कुठले कुठले मित्र आठवले आणि गुजरातचा भूकंप आठवला. तिथे आम्ही एकत्र होतो. भूकंप होऊन गेला होता. पण भूकंपाचे धक्के अधूनमधून सुरूच असायचे. विध्वंसाच्या भयानक कथा, प्रेतं, उद्धस्त शहरं यातून आमच्या सगळ्यांच्या नकळत भीती मनाच्या कोप-यात जाऊन बसली होती.

सुनील आमच्यात सगळ्यात लहान आणि थोडा घाबराही. मी, मारुती मालेप किंवा भरतभाई चौहान यापैकी कुणीतीरी त्याला सोबत लागायचंच. रात्री झोपतानाही दोन जणांच्या मधे येऊन झोपायचा. त्याच्यामुळेच त्या दिवशी हॉटेलातल्या कॉटवर चौघे झालो होतो. मी, सुनील, मारुती आणि आणखी उदय म्हणून एक कॅमेरामन. गर्दी झाली म्हणून सुनील झोपल्यावर मी वरच्या मजल्यावर दुस-या रूममधे झोपायला गेलो. तिथे रणधीर कांबळे आणि भरतभाई होते. रणधीर आणि मारुती पहाटे उठून लांब शूटला जाणार होते.

रणधीर भल्या पहाटे उठला. मारुतीच्या रूमवर जाऊन दरवाजा वाजवला. आत जाग नव्हती म्हणून बराच वेळ दरवाजा वाजवावा लागला. तरीही जाग नाही. दरवाजा जोरजोरात वाजवला. कंटाळून परत निघाला. बहुतेक दारावरच्या शेवटच्या ठोक्याने  मारुतीला जाग आली. त्याची झोप अचानक उघडली. धावतच तो दरवाजा उघडायला गेला. नेमका तेव्हाच सुनील उठला. मी शेजारी नाही. मारुती धावत दरवाजा उघडायला जातोय. हे बघून त्याला वाटलं, भूकंपच आलाय. तो जोरजोरात बोंबटतच उठला. मारूतीने थोड्याश्या उघडलेल्या दरवाजातूनच तो तसाच ओरडत सुसाट धावत सुटला. अरे, काय झालं, असं विचारत मारुती त्याच्यामागे धावतोय. इथे रूममधला तिसरा माणूस म्हणजे उदयही उठला. हा अंगापिंडाने भरदार हा साऊथ इंडियन माणूस सिनेमात शोभणाराही हबकलेलाच होता. काय करावं ते त्याला कळतच नव्हतं. तो तसाच बेडवर उभा राहून बोंबा मारू लागला.

Tuesday, 28 June 2011

महाराष्ट्राला वळण लावणारा विचारवंत


परवाच राज्य सरकारचं मासिक लोकराज्य प्रकाशित झाला. तो वाचन विशेषांक आहे. मुळातून वाचण्याजोगा. सदानंद मोरे, हरी नरके, रा. रं. बोराडे, विजया राजाध्यक्ष, जयसिंगराव पवार, अरूण टिकेकर, सतीश काळसेकर, कुमार केतकर, अऱुण साधू अशा अनेक जाणकारांचे लेख आहेत. काय वाचावं, आवडती पुस्तकं असा छान आढावा आहे. तो एक संग्राह्य अंक झालाय. प्रल्हाद जाधवांना याचं श्रेय द्यायला हवं.

या थोरामोठ्यांबरोबर माझाही एक लेख त्यात आहे. त्याचा आनंद आहेच. पण त्याहीपेक्षा आनंद लेख प्रबोधनकार ठाकरेंवर आहे याचा आहे. प्रबोधनकारांना त्यांचं हक्काचं मानाचं स्थान मिळालंय, हे महत्त्वाचं. गेल्या सप्टेंबरात प्रबोधनकारांच्या सव्वाशेव्या जन्मदिनानिमित्त prabodhankar.com ची सुरुवात झाली. ती संकल्पना आणि संशोधन माझंच होतं. तरीही माझा मित्र राहुल शेवाळेची मदत नसती तर ती संकल्पना माझ्या डोक्यातच राहिली असती. वेबसाईट अद्याप पूर्ण झालेली नाही. अनेक चुका राहिल्यात. अनेक टाइप झालेली पुस्तक अपलोड व्हायचीत. त्यावर मी पुन्हा एकदा नव्याने कामाला लागलोय. एखाद्या वाचन विशेषांकात प्रबोधनकारांचा समावेश होतो, हे प्रबोधनकार डॉट कॉमच्या टीमच्या प्रयत्नांचं यश आहे, असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. काल अंक आल्यापासून अनेक जण आवर्जून प्रतिक्रिया नोंदवत आहेत. प्रत्येक वेळेस प्रबोधनकार त्यांच्यापर्यंत पोहोचला, याचा वारंवार आनंद होतोय. लेख पुढे कटपेस्ट केलाय. तुम्ही वाचला तर मला पुन्हा पुन्हा आनंद होईल.

मेरिटचा गरबा



२००९च्या जूनमधे एकामागून एक परीक्षांचे निकाल समोर येत होते. त्यात गुजराती पोरांची संख्या खूप होती. यावर्षी परीक्षांचे निकाल वाचताना मला तेच आठवत होतं. गुजराती मुलांची नाव यंदाही मेरिट लिस्टमधे अधूनमधून दिसली. हे थोडं धक्कादायकच आहे. कारण गुजरात्यांची आपल्या लेखी ही ओळख नाही. आपल्याला गुज्जू माहीत ते असे स्कॉलर म्हणून नाहीच. तेव्हा लिहिलेल्या लेखाचा इण्ट्रो होता, एखाद -दुसरा अपवाद वगळला तर यंदाच्या झाडून सगळ्या परीक्षांमध्ये गुजराती मुलं टॉपर्स आहेत. या मेरिटच्या गरब्याचं थेट गणित ग्लोबलायझेशनशी जोडलेलं आहे.

मी राहतो तो कांदिवलीचा भाग गुजराती भाषकांचा गड आहे. माझे कित्येक शेजारी, लहानपणीचे खेळगडी, मित्रमंडळी गुजराती आहेत. आजूबाजूला जितकं मराठी ऐकलं, तितकंच गुजराती आणि हिंदीही. शेजारीपाजारी जितका नवाकाळ यायचा तितकाच गुजरात समाचार आणि मायापुरीही. त्यामुळे गुजराती भाषा कानाला डोळ्याला कधीच परकी वाटली नाही. आणि माणसंही. ती घरातलीच होती. गुजराती मित्र आमच्यासोबत दस-याचं सोनं वाटायला यायचे. आम्ही त्यांच्यासोबत दिवाळीत साल मुबारक करत फिरायचो. एकमेकांच्या बोलण्यावर, खाण्यापिण्यावर, जगण्यावर प्रभाव टाकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. गुजराती म्हणजे गर्भश्रीमंत असतात, असं काही लोकांना वाटत असतं. पण आमच्या वाडीत गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय गुजराती लॉटमधे बघितले. त्यात एक बदल समोर दिसत होता. इथले गुजराती पहिल्यांदाच इथक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणावर भर देत होते. ते निरीक्षण या लेखात नोंदवलंय. आता दरवर्षी हा बदल अनुभवता येतो. जुना लेख कटपेस्ट.

Monday, 27 June 2011

कृषीवलला माझा नवा कॉलम सुरू झालाय



संजय आवटे. त्यांचं गेली अनेक वर्ष वाचत होतो. आज आपल्या मराठी पेपरांमधे नवा थॉट देण्याची क्षमता असणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच भेटतात. आवटेंचं नाव त्यात खूप वर घ्यायला पाहिजे. त्यांची दोन पुस्तकं मराठीतून इंग्रजीत ट्रान्सलेट होतात आणि चांगली खपतात, यातच त्यांचं मोठेपण दिसतं. माझा त्यांचा परिचय तसा ते लेखक आणि मी वाचक असाच. पण ते कृषीवलचे संपादक झाल्यानंतर म्हणजे अगदी कालपरवाच त्यांची भेट झाली.

त्यांच्याविषयी असलेल्या आदरामुळेच कृषीवलमधे कॉलम लिहायला हो म्हणालो. पण खरंच नवशक्तिच्या एका कॉलमासाठीच वेळ काढणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे मीच एक कॉलमचं वेगळं स्वरूप सांगितलं, ज्यात फार वेळ जाणार नाही. जे काही वाचतो, पाहतो त्यातली एखादी आवडलेली गोष्ट शेअर करणं, असं याचं स्वरूप असणार आहे. तीही अगदी थोडक्यात. कॉलमचा वार आणि नाव अजून फायनल होतंय. गेल्या आठवड्यात पहिला हफ्ता टाकलाय. तो असा होता. ज्याची शिफारस केलीय तो मूळ इंग्रजी लेख खाली कटपेस्ट केलाय आणि वर माझी शिफारस.माझ्या लेखाचं नाव होतं बेशर्मी मोर्चा. 

Saturday, 25 June 2011

एका गावाची गोष्ट


नुकताच कोकणात जाऊन आलो. कोकणात मूळ गाव कोटकामते, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदूर्ग. पण गाव तसं नावापुरतं. मी नवसाचा, म्हणून तीन वर्षांचा असताना कुलदेवी भगवतीला दर्शनाला नेण्यात आलं होतं. त्यानंतर गावी गेलो ते थेट लग्न झाल्यावर. त्यामुळे मी राहतो त्या कांदिवलीलाच आपला गाव मानत आलो. पुढे पत्रकारितेत आलो. कधी साहित्य संमेलनासाठी तर कधी निवडणुकांसाठी कोकणात फिरलो. कशामुळे माहीत नाही, पण आतून जाणवत राहिलं की आपली नाळ इथेच कुठेतरी लाल मातीत पुरलेली आहे.

कोकणाचं गारुड एकदा तुमच्यावर भारलं की मग इथल्या दगडमातीपासून भुताखेतांपर्यंत सगळं आपलं वाटायला लागतं. तोच आपलेपणा घेऊन मी नारायण राणे यांची मालवण मतदारसंघातली पोटनिवडणूक कव्हर करायला गेलो होतो. साल बहुदा २००५. राणेंनी नुकतंच सेनेविरुद्ध बंड केलं होतं. मुंबईपासून बांद्यापर्यंत सारा कोकणपट्टा राणेमय झाला होता. मी तिथे पोचल्यावर माझ्या डोक्यातल्या कोकणापेक्षा वेगळंच चित्र वेगळंच दिसत होतं. मी बिनधास्त राणेंच्या राड्यांच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. अनेक लोक मला समजवायला येऊ लागले. मी काय करतो, कोणाला भेटतो, यावर नजर ठेवली जात होती. अगदी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकरांनीही मालवणात कोणतीही दादागिरी होत नसल्याचा लेख आमच्याच पेपरात लिहून मला जणू व्हिलन ठरवला होता. पण मला तिथे दहशत पावलापावलावर जाणवत होती. खासदारांनाही मारहाण होत होती. मी त्यावर बरंच लिहिलं. एक रोंबाट नावाचा कॉलमही लिहिला होता. हा सगळा अनुभव खूप मस्त होता.

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे


आज डॉ. सदानंद मोरेंचा वाढदिवस आहे. पुणे विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख, साहित्य अकादमी विजेते लेखक, इतिहास आणि संतसाहित्याचे अभ्यासक यापेक्षाही एक स्वतंत्र प्रतिभेचे महान विचारवंत म्हणून मोरे सरांचं योगदान मला फार मोठं वाटतं. तुकाराम दर्शन आणि लोकमान्य ते महात्मा या त्यांच्या दोन्ही महाग्रंथांनी जगाकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलून जातो. लिहिताना किंवा एकूणच विचार व्यक्त करताना जाती, भाषा, प्रदेश, पक्ष, संघटना, विचारधारांच्या अभिनिवेशाला बळी पडणं आज कठीण झालंय. अशावेळेस मोरेंचं लिखाण वेगळं उठून दिसतं. एकाच वेळेस सत्याचा आग्रह आणि विरोधी मताबद्दलची सहिष्णुता त्यांच्या लेखनातून सापडते. ती माझ्यासारख्या नवशिक्या पत्रकाराला महत्त्वाची वाटते.

आज नवशक्तित छापून आलेल्या लेखात वारीविषयी लिहिलंय. यातलं जे काही चांगलं आहे किंवा तुम्हाला जे काही आवडेल ते मोरे सरांच्या लिखाणातूनच पूर्वी वाचलं असेल असं खुश्शाल समजावं. लेख कटपेस्ट.

Friday, 24 June 2011

अवघा रंग एक झाला


झक मारली आणि पत्रकारितेत आलो, असं सांगणारे मित्र जवळपास रोज भेटतात. पण मला तसं कधीच वाटलं नाही. पत्रकारितेत असण्याचा अभिमान आणि आनंद मी सतत अनुभवतो. पत्रकारितेत रोज नवं आणि नव्याने जगता येतं. त्यात असे काही अतीव समाधानाचे क्षण अनुभवता येतात की त्यांवर अख्खं आयुष्य आनंदात जाऊ शकतं. तसा एक अनुभव माझ्या गाठिशी आहे, तो वरळी नाक्यावरच्या भिमडीवाला बिल्डिंगमधला.

गोरेगावचे वारंग आजोबा. आमच्या कुटुंबाशी अनेक वर्षांचे परिचित. वारकरी आणि स्वाध्यायी. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयीच्या बातम्या पेपरात आल्या इतके ते सामाजिक कामात होते. त्यांच्याकडे खूप पुस्तकं होती. त्यांचं काय करायचं, हा त्यांच्या घरातल्यांना मोठा प्रश्न होता. त्यांचे नातू राजू सावंत यांचे आमचे घरोब्याचे संबंध. त्यांनी मला पुस्तकं बघायला घरी यायला सांगितलं. पण मी तेव्हा नुकताच नव्या नोकरीत लागलो होतो. माझं जाणं झालं नाही. तसं त्यांनीच दोन पुस्तकांचे गठ्ठे आमच्या घरी आणले. हे गठ्ठे अनेक वर्षं शो केसच्या कपाटावर पडून होते.

सगळी पुस्तकं जुनी झाल्यामुळे थोडी फाटलेली पण नीट कव्हर घातलेली. जवळपास सगळी अध्यात्मिक. त्यात एक पुस्तक दिसलं, ‘श्रीसंत चोखामेळा महाराज याचे चरित्र व अभंग गाथा’. छान बाईंडिंग, पानं जवळपास अडीचशे. नवा खजिनाच सापडला होता. चोखोबांबद्दल थोडं फार ऐकलं होतं. पण माझ्यासाठी तो वारकरी परंपरेने घडवलेल्या क्रांतीचा दाखलाच होता. त्याहीपेक्षा मी हादरलो ते चोखोबांच्या पत्नी सोयराबाईंचे अभंग वाचताना. अवघा रंग एक झाला हा अभंग माझ्यालेखी तोवर फक्त किशोरी आमोणकरांचाच होता. आता तो माझ्यासाठी चोखियाच्या महारीचा, सोयराबाईंचा झाला होता. मला झालेला हा साक्षात्कार मी जमेल त्याला सांगत होतो. चोखोबांवरची इतर पुस्तकं जशी जमतील तशी वाचत होतो. तेव्हा मला या चोखोबांच्या गाथेचं महात्म्य आणखी कळत होतं.

Saturday, 18 June 2011

मुंडे आता काय करणार?


गोपीनाथ मुंडे म्हटलं की आजही शरद पवारांच्या भ्रष्टाचाराविषयीची आंदोलनं आठवतात. त्यांना त्या काळात बघितलेली लोकं विशेषतः तेव्हाचे पत्रकार अजूनही त्या इमेजमधून बाहेर आलेले दिसत नाहीत. पण माझ्या वयाच्या पत्रकारांना ते मुंडे माहीत नाहीत. आम्ही बघितलेल्या मुंडेंच्या सभांना गर्दी जमत नाही. अगदी पाशा पटेलच्याही समोर त्यांचं भाषण फिकं पडतं. चार पत्रकारांच्या किंवा नेतेमंडळींच्या वर्तुळातून ते बाहेर पडत नाहीत. कधी पवारांशी, कधी भुजबळांशी, कधी विलासरावांशी त्यांचं मेतकूट सुरू असतं.

कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क राहिलेला नाही. सहज संवाद साधता येतील अशापद्धतीने ते पदाधिका-यांशीही वागताना दिसत नाहीत. ते स्वतःही आपल्या त्याच लढाऊ इमेजच्या प्रेमात आहेत. पण आता कोणत्याही पद्धतीने लढण्याची तयारी दिसत नाही. कदाचित हे फक्त माझं वैयक्तिक निरीक्षण असेल. त्यात काही ग्रह पूर्वग्रहही असू शकतील. पण तरीही माझ्या इतर मित्रांशी चर्चा करताना इतरांच्याही डोळ्यासमोर त्यांच्याबद्दलची प्रतिमा बरीचशी अशीच आहे.

त्यामुळे मुंडेंच्या नाराजीचं विश्लेषण करताना सिनियर मंडळी आणि आमच्या बरोबरची किंवा नंतरची मंडळी यांच्यात बरंच अंतर पडतं. मुंडेंचा मासबेस गडकरी, तावडेंपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे मुंडेंविरुद्ध बोलण्याची त्यांची औकात नेहमीच विचारात घ्यायला पाहिजे, हे खरंच. पण मुंडेंचा तो पूर्वीचा मासबेस खरंच उरलाय का, हा प्रश्न विचारात क्वचितच घेतला जातो. आता मराठवाड्यातून फक्त दोन आमदार निवडून आलेत, त्यात एक मुंडेंची लेक आहे, हे बघितल्यावर नव्या संदर्भात हे मासबेसचं गणित तपासून घ्यायला हवंय. मुळात महाराष्ट्रात भाजपची ताकद ती केवढी. अर्ध्यापेक्षाही कमी सीटांवर लढणारा हा पक्ष. त्यातही अनेक ठिकाणी ताकदीची बोंब. बाकीच्या अनेक राज्यांत म्हणजे उत्तर प्रदेशपासून कर्नाटकापर्यंत भाजपची स्वबळावर एकदा तरी सत्ता आलीय. तिथल्या नेत्यांना जननेता म्हणणं योग्य आहे. पण भाजपच्या एखाद्या नेत्याला असं कसं म्हणता येईल.

आता मुंडेंना शेटजी भटजींच्या पक्षातला बहुजन म्हणून झुकतं माप द्यावं, असंही नाही. खरं तर आता भाजपमधे अनेक नव्या पिढीत तावडेंपासून मुनगंटीवारांपर्यंत अनेक बहुजन चेहरे समोर आलेले आहेतच. संघाच्या एकूण स्ट्रॅटेजीत मुंडे फिट बसले म्हणून त्यांना मोठी स्पेस मिळाली. ते नसते तर त्यांच्याजागी आणखी कुणी असतं. त्यांनी अनेक बहुजन नेत्यांना भाजपमधे आणलं, तसंच अनेक बहुजनांना संपवलं हेदेखील विसरायला नको.

Wednesday, 15 June 2011

‘मुंबई आमचीच’ क्यों कहते हैं मराठी ?


मुंबईत हम लोग नावाची एक संस्था आहे. मुंबई काँग्रेसचे एक पदाधिकारी विजय सिंग यांच्या नेतृत्वात उत्तर भारतीय त्यात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. मुंबईच्या विविध समस्यांवर ती काम करते. शिवाय महत्त्वाचं म्हणजे महिन्यातून एकदा शहरातले हिंदी साहित्यिक एकत्र आणून त्यांच्यात परस्परसंवाद वाढवण्याचं कामही ही संस्था करते.

ते दरवर्षी हमलोग गौरव सन्मान नावाचा पुरस्कार देतात. यंदा त्यांच्या पुरस्कारांमधे माझं नाव होतं. एप्रिलमधे त्याचा कार्यक्रम पार्ल्यात झाला. पुरस्काराचा आनंद होताच. पण पुरस्कार पार्ल्यात दिल्याचा अधिक आनंद होता. J  दुसरा आनंद, माझ्यासोबत हा पुरस्कार मिळाला तुळशीदास भोईटेला. तुलसी माझा जवळचा मित्र. मोठा पत्रकार. सोबतच हिंदीवर प्रेम असणारे उत्तम लेखक अनंत श्रीमाली आणि सामनामधील ले आऊटचे जादूगार भालचंद्र मेहेर यांनाही पुरस्कार देण्यात आला.

तिथलं माझं हिंदीतलं भाषण बरं झालं. त्यातले महत्त्वाचे मुद्देः एका हिंदी भाषकांच्या संस्थेकडून पुरस्कार मिळतोय याचा आनंद आहे. हिंदी भाषा फक्त युपी बिहारवाल्यांच्या बापाची पेंड नाही. ती त्यांच्याइतकीच आमचीही आहे कारण ती राष्ट्रभाषा आहे. कुणी बिहारी पद्धतीने हिंदी बोलणार असेल, युपीच्या ढंगात हिंदी बोलणार असेल. तर मी मराठी हेलाची मराठी बोलणार. त्यात काही चुकीचं नाही. आणि खरी राष्ट्रभाषा ही आपली मुंबईचीच हिंदी आहे. तुपात तळलेली बनारसची हिंदी किंवा तंदूरीसोबत भाजलेली लखनौ हैद्राबादेची हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीच नाही. कारण त्या काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्यांना नाही कळत. तिथे सगळ्यांना सामावून घेणारी आपली मुंबईची हिंदीच कळते. आज गरज आहे ती पंढरपुरात जन्मून आजच्या पाकिस्तानापर्यंत पोहोचणा-या संत नामदेवांचा मराठी वारसा जपण्याची. नामदेवांनी एक दोन नाही सहा भाषांतून रचना केलीय. त्यांचा कबीर, नानकांपासून मीरा, नरसीपर्यंत थेट प्रभाव आहे. त्याचबरोबर हिंदीतले रईदास इथे भाषेचा कोणताही व्यत्यय न होता इथे रोहिदास बनतात आपले होतात. कवी भूषण इथे येऊन शिवरायांवर कवनं रचतो. ही सांझी विरासत आपल्याला हवीय. आज राजकारणासाठी काही लोक मराठी हिंदीत भांडणं लावत आहेत. अशावेळेस शेकडो वर्षं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून चालणा-या या दोन संस्कृतींनी एकमेकांशी संवाद साधण्याची गरज आहे.

Tuesday, 14 June 2011

माधुरी काय हे?



काही दिवस माधुरीची जाहिरात टीव्हीवर अधूनमधून दिसतेय. जितक्यांदा दिसते तेव्हा जीव जळतो. त्यावर लेख लिहिला. पण त्यात काहीतरी राहिलंय, असं वाटतं. काहीतरी अडलंय असं माझंच मला वाटतंय. काय झालंय ते कुणी सांगेल का?

टीव्हीवर जाहिराती सुरू असतात. अचानक तुतारी वाजते. तो तिच्या मोबाईलचा रिंगटोन असतो. ती टेच्यात फोन उचलते. गंगूबाई बोलत्येय.मोलकरणीच्या वेषात दीक्षित, नेन्यांची आणि तेवढीच आपल्या सगळ्यांची माधुरी गंगूबाई बनलेली असते. इनिसपेक्शन करत्येय. असं म्हणत ती घरातल्या भांड्यांची तपासणी करते. कथित मराठी वळणाचं हिंदी बोलते आणि एक्स्पर्ट नावाचा एक भांडी घासायचा साबण वापराचा सल्ला देते.

Monday, 13 June 2011

रिपोर्टर की पोर्टर?


बरेच दिवस ब्लॉगवर आलो नाही. बरेच दिवस फेसबुकावरही नव्हतो. एका कामात अडकलो होतो. पण लिहिणं तसं सुरू होतं. त्याचदरम्यान एक लेख लिहिलाय. आमचे ज्येष्ठ मित्र संजय आवटे कृषीवलचे मुख्य संपादक झालेत. त्यांच्या रिलाँचिंगच्या अंकात पत्रकारितेवर मला लेख लिहायचा होता. तेव्हा म्हणजे सात तारखेला हा लेख लिहिला. रिपोर्टर की पोर्टर असं त्याचं नाव होतं. पण तो थोडा त्रोटक होता. त्यात भर घालून, काही मुद्दे सविस्तर लिहून हा लेख तयार झालाय. नवा लेख माझ्या नवशक्तितल्या समकालीन कॉलमात रिपोर्टर आहेत कुठे या नावाने शनिवारीच छापून आलाय.

साधारण सव्वा वर्षांपूर्वी मी पाच वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा टीवीच्या बातम्यांत परतलो. तेव्हा खूप गोष्टी बदलल्या होत्या. आम्ही बूम घेऊन धावायचो तेव्हाचं आणि आताचं जग बदलल्याचं दिसत होतो. त्यातला सर्वात धक्कादायक बदल होता, तो रिपोर्टरचं कमी झालेलं महत्त्वं. तेव्हा आम्ही इथे मुंबईतून बसून दिल्लीतल्या चॅनलचेही अजेंडे बदलायचो. आता रिपोर्टरकडून रेम्याडोक्याने धावत राहण्याची अपेक्षा असते. त्यावर लिहिलंय. ९५ साली ऑक्टोबरमधे कॉलेजमधे असताना माझं पहिलं आर्टिकल आज दिनांकमधे छापून आलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत मीडियाकडे शक्य तितक्या डोळे उघडे ठेवून बघतोय. प्रिंट, टीवी, नेट, मराठी, हिंदी, थोडंफार इंग्रजी असं फिरून आलोय. मी स्वतःला मुळातला डेस्कवाला मानतो. तरी जास्तीत जास्त काळ बातमीदारीच केलीय. तीही अगदी आनंदाने आणि मानाने. त्यामुळे सालं रिपोर्टरची किंमत कमी होताना बघताना खूप खुपत राहतं.

Saturday, 21 May 2011

शिवशक्ती भीमशक्तीः राजकारण की समाजकारण?


पुरुषोत्तम खेडेकर नावाच्या माणसाचं ब्राम्हणांबद्दलचं एक अत्यंत विकृत लेखन सध्या सगळीकडे इंटरनेटवर फिरतंय. हे अशापद्धतीचं नीच आणि घाणेरडं डोकं असलेला हा माणूस परिवर्तनवादी आणि बहुजनवादी संघटनांच्या गोष्टी वर्षानुवर्षं करत होता, हे धक्कादायक आहे. मराठा संघटना अशाच प्रकराचं खालच्या पातळीवरच्या गोष्टी करणार असतील, तर मराठेतरांमधे त्याचे प्रतिसाद उमटणारच आहेत. मला वाटत त्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती भीमशक्ती महत्त्वाची आहे. पण त्यासाठी या राजकीय समीकरणाकडे सामाजिक अंगाने पाहिलं जातंय. पण राजकीय पक्षांकडून तशा फारशा अपेक्षा नाही करता येत.

त्याहीपेक्षा आजघडीला महत्त्वाचा मुद्दा हा की यातून राजकीय फायदा फारसा नाही. फार तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या मोठ्या शहरांमधे शिवसेनेला थोडाफार फायदा होईल. कारण आजवर दलित मतं सेनेला हरवण्यासाठी एकत्र यायची, ते थांबू शकेल. त्यातली किती मतं युतीला मिळतील, हे आता सांगणं कुणालाच शक्य नाही. पण विरोधातलं ध्रुवीकरण जरी थांबवलं तरी सेना भाजपच्या पदरात मुंबई ठाणे महापालिकेसाठी खूप काही पडणार आहे. तरीही याचा राजकीय अंगाने विचार करता कामा नये, ते राजकीय दृष्टीनेही फारसं फायद्याचं ठरणारं नाही.

दहा बारा दिवसांआधी उद्धव, मुंडे आणि आठवले यांच्या पत्रकार परिषदेत गेले होतो. तिथे त्यांचा सगळा अजेंडा राजकीयच असल्याचं दिसलं. काँग्रेसविरोध हा काही शिवशक्ती भीमशक्तीचं वैचारिक अधिष्ठान असू शकत नाही. ते यशस्वीही होऊ शकत नाही. उलट याकडे सामाजिक अंगाने पाहिल्यावर एक पक्ष म्हणून शिवसेनेचं स्वीकारमूल्य वाढणार आहे. हे बेरजेचं राजकारण यातून फायदा होणारच पण लांबवर. तोवर वाट बघण्याची यांची तयारी आहे का, हे मात्र माहीत नाही. या विषयावर नवं लिहिण्यासारखं काही नाही. त्यामुळे लेख कटपेस्ट करतोय.

Friday, 20 May 2011

दशावतारी

माझ्या आधीच्या आणि माझ्या पिढीच्या पोरांमधे कमल हासनबद्दल एक वेगळा कोपरा आहेच. सन्नीपासून अमीरपर्यंत आणि हृतिकपासून सलमानपर्यंत कुणाचेही फॅन असले तरी कमल हासनची गोष्ट वेगळी आहे. मुंबई टाइम्समधे असताना मी थोडंफार सिनेमावर लिहिलं. तेव्हा कमलचा 'दशावतार' हिंदीत डब होऊन मुंबईत रिलीज झाला होता. त्याच्या हासनच्या यात दहा भूमिका होत्या. मुखवट्यांच्या या खेळात तो 'अप्पू राजा'पासून रमलाय. त्यात त्याचा खरा चेहराच हरवलाय का, असा माझा प्रश्न होता. त्याचा सिनेमा कितीही बकवास असला तरी कुठूनतरी आपल्याला समृद्ध करून जातो, असा माझा अनुभव आहे. 

Wednesday, 18 May 2011

तरुणांचा तुकाराम


या शनिवार रविवारी म्हणजे २१ आणि २२ तारखेला पुण्यात पहिलं बहुजन संत साहित्य संमेलन होतंय. देशभरातून वक्ते त्यात बोलत आहेत. त्याच्या आयोजकांशी माझा तसा थेट परिचय नाही. तरीही त्यांनी मला बोलवलंय, याचा आनंद आहे. त्यात २२ तारखेला सकाळीच सकाळी संतसाहित्य आणि प्रसारमाध्यमं असा एक परिसंवाद आहे. हरी नरके, बबन नाखले अशा जाणकार माणसांबरोबरच मीही त्यात बोलणार आहे. बोलायचा प्रयत्न करणाराय.

आता बोलायचं म्हटल्यावर तयारी हवी म्हणून आता थोड्या वेळापूर्वीच मावलींची ज्ञानेश्वरी काढलीय, तुकाराम महाराजांची गाथा काढलीय. सदानंद मोरेंचं तुकाराम दर्शन तर मास्टरपीसच आहे. सोबतीला आ. ह. साळुंखेंचं विद्रोही तुकारामही आहे. सोबत नामदेव आणि चोखामेळ्यांवरचीही दोनदोन पुस्तकं काढलीत.

पुस्तकं उघडण्याआधी थोडं आपल्याच दामन में झाकून बघणं गरजेचं वाटलं. कारण विषय थेट आपल्याशी जोडलेला आहे. मीडियात आहोत तर आपण संतसाहित्यावर काय काय काम केलंय ते तपासायला हव, असं वाटलं. फार काही हाताला लागलं नाही. आणखी करायला हवं होतं असं वाटलं. महाराष्ट्र टाइम्सने सांस्कृतिक विशेषांक काढले. त्याच्या पहिल्या अंकात बडव्यांवर लिहिल्याचं लगेच आठवतंय. त्याचं श्रेय जयंत पवारांना. त्यांनीच आषाढी विशेषांकांत वारीचं मॅनेजमेण्ट या विषयावर डब्बेवाल्यांशी बोलून लेख करायला लावला होता.

Thursday, 5 May 2011

छोट्या शहरातला मोठा पोरगा


गेल्या शुक्रवारी नवशक्तित माझा कॉलम छापून आला. लेखाचा विषय महेंद्रसिंग धोनी आहे. आज त्याला पेप्सीच्या नव्या गटक गटक ऍडमधे पाहिलं. तो आला तेव्हाच काहीतरी वेगळं रसायन होतं हे कळलं होतं. आता तर त्याने आपली छाप कायमस्वरूपी सोडली आहे. आता तो जगातल्या शंभर सर्वात प्रभावशाली माणसांपैकी एक आहे. ओसामाला मारणारे ओबामाही त्याच्याइतके प्रभावी नाहीत, असं टाईम मॅगझिन म्हणतंय.

लेख कटपेस्ट केलाय.

टाईम मॅगझिन जगभरातल्या शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तीची यादी प्रकाशित करत असते. परवा ती यादी आली. ही यादी खूप इंटरेस्टिंग आहे. फेसबुकवरच्या एका स्टेटसमुळे इजिप्तमधे क्रांती घडवणारा गुगलमधे काम करणारा साधा नोकरदार वेल घोनीम या यादीत पहिल्या नंबरवर आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग सातव्या नंबरवर आहे. तर विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांगी नवव्या स्थानावर आहे. आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक शेवटच्या रांगेत म्हणजे ८६ व्या स्थानावर आहेत.

मी शिवाजीराव गायकवाड बोलतोय

रजनीकांत हगायला बसला... मी एसेमेस वाचायला लागलो. खाली खाली स्क्रोल केलं. बराच वेळानंतर शब्द दिसले... आता त्याला आणखी किती छळणार, सुखाने हगू तरी द्या!

रोबोट हीट झाला तेव्हापासून रजनीकांतच्या नावाने असे ज्योकवर ज्योक सुरूच आहेत. पडद्यावर सुपरहीरो पण प्रत्यक्षात टक्कल आणि दाढीचे पांढरे खुंट त्याने कधी लपवले नाहीत. रोबोट रिलिज झाला, त्या काळातच तो मुंबईत आला होता. बाळासाहेब ठाकरेंना भेटलाही होता. तेव्हा त्याच्यावर लिहिलं होतं.

आता रजनीकांत आजारी आहे. हॉस्पिटलमधे दाखल आहे. आपलं कुणी आजारी झालं की त्याला भेटायला जावसं वाटतं. तसंच वाटलं. म्हणून त्याच्यावरचा हा लेख टाकतोय. सध्या ब्लॉगवर मराठी अस्मितेची चर्चा सुरू आहे. तीदेखील यानिमित्ताने सुरू राहू शकेल.

मराठी बाण्याचा असाही इतिहास

मी पेपरात लिहायला सुरुवात केली ती बॉलीवूडच्या रिपोर्टिंगनेच. सांस्कृतिक वगैरेच करायची इच्छा होती. राजकारण समाजकारणावर लिहिन असं कधी वाटलं नव्हतं तेव्हा. आता राजकारण समाजकारणावर नेहमी लिहिताना क्वचित कधीतरी फॉर अ चेंज नाटक सिनेमावर लिहिलंय अधूनमधून.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोयरिलिज झाला तेव्हा हा लेख लिहिलाय. मला तो सिनेमा बिलकूल आवडला नाही. क्वचित काही डायलॉग सोडले तर त्यात काही घेण्यासारखं नव्हतं. त्यातल्या शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कळलेच नव्हते. त्यातले चमत्कार करणारे, झिंगलेल्या डोळ्यांचे शिवराय बघणं म्हणजे शिवरायांचा अपमानच होता. तरीही हा सिनेमा धो धो चालला. कारण एकच त्याने मराठी माणसाच्या दुख-या नसेवर बोट ठेवलं होतं. ही नस ज्याला सापडली तो जिंकला. राजकारणातल्या राड्यांमधेही आपल्या सगळ्यांचा हाच अनुभव आहे.

मुंबई टाइम्सची कव्हर स्टोरी म्हणून मी मराठी बाण्याचा एक वेगळा इतिहास मांडायचा प्रयत्न केला होता. नाटक सिनेमातून मराठी बाणा कसाकसा व्यक्त झालाय, त्यावर हा लेख होता. त्याचा इण्ट्रो असा होता, मराठी माणूस खरं तर जगभर विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे. पण मुंबईत होणा-या ख-या खोट्या कुचंबणेने तो असुरक्षिततेच्या कोषातही अडकलाय. त्याचा हा विविधरंगी मराठी बाणा सिनेमा नाटकांतून अनेकदा व्यक्त झालाय. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा त्याचा लेटेस्ट अविष्कार. पण शिवाजीराजेनेही मराठी बाण्याचा ट्रेण्ड काही उभा राहिला नाही.

बर्लिनच्या भिंती पाडण्यासाठीच असतात


परवा एक मेच्या दिवशी आम्ही मी मराठीवर विशेष बुलेटिन केलं होतं. शाहिरांच्या देशा नावाचं. आमचे मित्र श्रीरंग गायकवाड यांनी आमच्या सगळ्या सहका-यांच्या मदतीने हे जमवून आणलं होतं. त्यात अमरशेख, अण्णाभाऊ, गवाणकर, चंदू भरडकर, आत्माराम पाटील, विठ्ठल उमप, शाहीर साबळे, लीलाधर हेगडे असे दिग्गज शाहीर दिसले. काहीजणांचा आवाजही ऐकता आला. विशेष म्हणजे लीलाधर हेगडे, आत्माराम पाटील यांच्या पत्नी इंद्रायणीताई, मधुकर नेराळे, संभाजी भगत, सुबल सरकार, सोलापूरचे अजिज नदाफ, सांगलीचे आदिनाथ विभूते, नंदेश उमप, अमर शेखांच्या थोरल्या कन्या प्रेरणा बर्वे, धाकटे जावई नामदेव ढसाळ, जीएल आणि तारा रेड्डींचे सुपुत्र प्रकाश रेड्डी, प्रकाश खांडगे इतक्या जणांना शाहिरांविषयी बोलतं केलं होतं. इतकं डॉक्युमेंटेशन टीव्हीवर कुठे एकत्र आल्याचं माझ्यातरी ऐकिवात नाही. तांत्रिकदृष्ट्या आमच्या काही मर्यादा नक्कीच आहेत. पण निदान आम्ही सगळ्यांची कृतज्ञतेने आठवण काढली. बरं वाटलं.

त्यात बेळगावचे एक वयस्कर शाहीर होते, गणपती तंगणकर. हाफपँट, सदरा आणि डोक्यावर फेटा अशा साध्या वेशातले हे शाहीर थकलेल्या आवाजात पोवाडा गाताना दिसले. त्यांच्या आवाजातली आणि नजरेतली खंत आताही डोळ्यासमोरून जात नाही. सीमाभागाचा मुद्दा हृदय कुरतडणाराच आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून पूर्ण झालेला नाही, अशीच यातल्या कार्यकर्त्यांची - नेत्यांची भूमिका होती. कारण बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार महाराष्ट्रात आलेला नाहीय. संयुक्त महाराष्ट्राची लढाई जितकी मुंबईत लढली गेली. तितक्याच त्वेषाने बेळगावातही लढली गेली. मुंबई मिळाल्यावर महाराष्ट्राने ढेकर दिला. पण बेळगाव दूरच राहिला, त्याचं फक्त वाईट वाटून घेतलं. मुंबईसारखं प्राणापणाने लढणारे सीमाभागासाठी तोंडदेखली आंदोलनं करत राहिले. मुंबई हातची गेली असती तर महाराष्ट्राच्या खिशावर आघात झाला असता. बेळगावात मन अडकलं होतं. मनाला काय किंमत द्यायची गरज नसते.

ही माती तुला कधीचीच विसरलीय

हुतात्म्यांच्या नावानं चांगभलं हा लेख ब्लॉगवर टाकला. त्याला तुम्ही नेहमीसारखं उचलून धरलंत. थँक्स. याच विषयावरचा आणखी एक लेख आठवला. विंदा गेले तेव्हा नवशक्तिच्या कॉलमात लिहिलेला. एखादा कवी लेखक गेला की आतून गलबलायला क्वचितच होतं. विंदा गेले तेव्हा झालं तसं. इतका मोठा, डोंगरापेक्षा मोठा माणूस. पण आपला वाटायचा साला. बालकवितांपासून अमृतानुभवाच्या मराठी भाषांतरापर्यंत त्याचं वाचलेलं सगळंच नितळ होतं. त्यांना मी ऐकलंही होतं दोनचारदा.

सगळ्यात आधी ९६ साली. कॉलेजात असताना आज दिनांकमधे लिहायचो. सावंतवाडीला कोकण मराठी साहित्य संमेलन होतं. अंबरीषजी मिश्रंनी आवर्जून पाठवलं होतं तिथं. वय होतं एकोणीस. आजही आहे असं नाही पण तेव्हा फारशी अक्कल नव्हती. फारसं काही आठवत नाही. पण विंदांचा कविता म्हणताना आकाश भारून उरणारा आवाज आठवतोय फक्त. तेव्हा त्यांनी हे श्रेय तुझेच आहेही कविता ऐकली होती.

Tuesday, 3 May 2011

हुतात्म्यांच्या नावानं चांगभलं


साधारण गेल्या नोव्हेंबर २००९ ची गोष्ट आहे. माझ्या एका मित्राने मला निरोप दिला. उद्धव ठाकरेंना मला भेटायचं होतं. भेटीचे दोन संदर्भ होते. एक मटात असताना हल्ला आणि पराभव  नावाचं आर्टिकल लिहिलं होतं. शिवसेनेनं वागळेंसाठी आयबीएन लोकमतच्या ऑफिसावर हल्ला केला होता. त्यावर मी टीका केली होती. त्याविषयी आमची चांगली चर्चा झाली. त्यापूर्वी अनेक वर्षं कार्यक्रम आणि प्रेस कॉन्फरन्सेसमधून आम्ही भेटलो असू. पण वन टू वन पहिल्यांदाच भेटलो होतो.

दुसरा संदर्भ हा की मी तेव्हा मटाचा राजीनामा दिला होता. नोटीस पीरियड चालला होता. पुढे मी मराठीत नोकरी धरली, पण तेव्हा पुन्हा नोकरी करायची इच्छा नव्हती. मी प्रबोधनकारांवर काम करायची इच्छा बोलून दाखवली. मी प्रबोधनकारांवर खूप खूप बोलत होतो. काय करता येईल, ते सांगत गेलो. त्यांनी पॉझिटिव रिस्पॉन्स दिला. त्यातून पुढे प्रबोधनकार डॉट कॉमचं काम उभं राहिलं.

Saturday, 30 April 2011

आयपीएलनं आपल्याला काय दिलं?


आता आयपीएल सुरू आहे. हळूहळू ते रंगात येतंय. पण पहिल्या दोन आयपीएलची मजा त्यात नाही. तेव्हा आयपीएलचा नशा सगळ्या देशाला चढला होता. तिसरं आयपीएल आपण सगळ्यांनी सचिनसाठी पाहिलं. आता वर्ल्डकप नुकताच झालाय. त्यामुळे आयपीएलचा अजून मजा येत नाहीय. पण म्हणून आयपीएलचं महत्त्व काही कमी होत नाही. कारण ती एक क्रांती आहे.

दुसरं आयपीएल संपलं तेव्हा मी मटामधल्या विंडो सीटमधे आयपीएलवर एक लेख लिहिला होता. मला हा लेख खूप आवडला होता. आज आयपीएलच्या मॅच बघतानाही तो लेख आठवतो. त्या लेखातले अनेक संदर्भ आज जुने झालेत. पण त्यातले मुद्दे महत्त्वाचे आहेत, असं मला वाटतं. आज वेस्ट इंडिज पाकिस्तानविरुद्ध हरतंय आणि त्यांचा मेन प्लेयर केविन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. क्रिस गेल रॉयल चॅलेंजर्सकडून खेळतोय. वाईस कॅप्टन ब्रावो टेस्ट सिरिज सोडून इथे येऊ घातलाय. मलिंगाने आयपीएल खेळण्यासाठी थेट टेस्ट क्रिकेटमधूनच निवृत्ती स्वीकारलीय. आता यावर टीका करायची की क्रिकेटकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलायचा, हे आपणच आपलं ठरवायचं. 

Thursday, 28 April 2011

आई, दार उघड !


कोल्हापुरात आई अंबाबाईच्या गाभा-यात तिच्या लेकींनी प्रवेश केल्यावरून बरीच गडबड सुरू आहे. अफवा उठवल्या जात आहेत. मोर्चे काढले जात आहेत. कुणी पुजारी आत्मदहन करण्याची धमकी देतोय. शाहू महाराजांच्या करवीरनगरीत हे घडताना बघून वाईट वाटतं. याच कोल्हापुराने पुरोगामी लढायांत महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय. त्यामुळे तिथले काही नतद्रष्ट या चांगल्या गोष्टीविरुद्ध मोर्चे काढून काहीही बडबड करतात, तेव्हा वाईट वाटतं. पण त्याला कुणी फारसं महत्त्व देत नाही, तेही बरंय. बायकांनी गाभा-यात केलेल्या पूजेचं आपल्याला आता अप्रूप वाटतंय. पण अगदी सहा सात महिन्यात हे नेहमीचं होणार आहे.

शाहू महाराजांच्या काळात याच गाभा-यात ब्राम्हणेतरांनाही अशाच प्रकारची प्रवेशबंदी होती. तेव्हा काही मराठा तरुण या गाभा-यात घुसले म्हणून तिथल्या पोलिसांनी त्यांना मारहाण केली होती. कैदेतही टाकलं. त्याविरुद्ध प्रबोधनकारांनी अंबाबाईचा नायटा म्हणून प्रबोधनमधे अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी शाहू छत्रपतींनाही सोडलं नव्हतं. असंच चालणार असेल, तर या अंबाबाईला रस्त्यावरच्या मैलदर्शक दगडांपेक्षा महत्त्व कशाला द्यायचं असं त्यांनी ठणकावलं होतं. अशावेळेस देवळं फोडणारे अफजुलखान, औऱंगजेब हे मोठेच महात्मे वाटतात, अशी मल्लिनाथी करायलाही ते विसरले नव्हते. याचा अर्थ प्रबोधनकारांना आई जगदंबेविषयी श्रद्धा नव्हती असं नव्हतं. सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना त्यांनीच केलेली.

Sunday, 24 April 2011

गुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही

गुगल सर्चवर सापडलेला गिरगावच्या शोभायात्रेतला एक यूट्यूब ग्रॅब. 
आज सकाळी नुकतेच दात घासून झाले होते. मोबाईल वाजला.

मी सामंत सर बोलतोय कल्याणहून. तुमचा लेख खूप आवडला हो. अगदी बरोबर आहे, तुम्ही लिहिलंय ते. तुम्ही लिहिलेलं सगळं पटलं. अगदी मनापासून.

थँक्यू थँक्यू.

मी आमच्या कल्याणमधल्या नव वर्ष शोभायात्रा समितीचा गेली बारा वर्षं पदाधिकारी आहे. तरीही सांगतो, पटलं तुमचं. हो, ते हेडगेवारांसकट सगळं पटलं. मुलं थर्टी फर्स्टला दारू पिऊन धिंगाणा घालतात. ते नको म्हणून आमच्यासारख्यांना गुढीपाडवा साजरा व्हायला हवा असं वाटतं. म्हणून आम्ही शोभायात्रेबरोबर.

आपला गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून.

मी बिर्ला कॉलेजचा वॉइस प्रिंसिपल होतो. आता रिटायर्ड झालोय. मी पाहिलंय ना मुलं गुढी पाडव्याला वेज न्यू इयर साजरं करतात आणि थर्टी फर्स्टला नॉन वेज न्यू इयर.

मी हसतो.

Thursday, 21 April 2011

वेलकम इडियट्स


गेल्या वीकेण्डला आंबाजोगाईला गेलो होतो. लातूरमधे महारुद्र मंगनाळेंच्या बातमीमागची बातमीया साप्ताहिकाच्या बाराव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होता. तिथून अमरजींना म्हणजे अमर हबीबांना भेटण्यासाठी आंबाजोगाईला गेलो होतो. अमरजींबरोबर दोन तासदेखील घालवणं हा श्रीमंत करणारा अनुभव असतो. इथे तर अमरजी दोन दिवस सोबत होते. खूप मजा आली.

कसा काय आठवत नाही, पण चर्चेत थ्री इडियट्सचा संदर्भ आला. माझ्या डोक्यात विचार आला की समोर हा एक मोठा इडियटच उभा आहे. नोकरी न करता सामाजिक कामात आयुष्य घालवणारा हा माणूस. अनेक मोठमोठ्या लोकांसोबत मी फिरलोय. त्यांना लांबून जवळून बारकाईनं पाहणं हा कामाचाच भाग. पण अमरजींच्या तोलामोलाचा माणूस महाराष्ट्राभरात मला तरी आजघडीला माहीत नाही. यात अतिशयोक्ती बिलकूल नाही. त्यांना भेटलं की एक ओतप्रोत आनंद मिळतो. आपण स्वतःला मोठे मानणारे सगळ्याच बाबतीत किती छोटे आहोत, हे कळतं. पण त्यातून कोणताही इन्फिरॅरिटी कॉम्प्लेक्स येत नाही. उलट मोठं बनायची प्रेरणा मिळते.

अमरजींनी प्रस्थापित मोठेपणाचा वाराही चुकून लागू नये यासाठी डोळ्यात तेल टाकून दक्षता बाळगलीय. आपल्याला कुणी मोठं म्हणालं तर आभाळच कोसळेल की काय, असं ते साधेपणाने वागत राहिले. त्यांनी त्यांच्या सोबतच्या कितीतरी माणसांचं जगणं समृद्घ बनवलंय. अमरजींचं बोट पकडून विचार करायला शिकलेली माझ्यासारखी पत्रकार किंवा कार्यकर्त्यांची एक पिढीच महाराष्ट्रात आहे. त्यांना आज साठीच्या जवळ आलेलं असताना त्यांना आपण समाज म्हणून काय दिलं?  अनेक खुज्यांच्या वाटेला सहजपणे जातो तो मानमराताब तरी. पण कधी त्याची अपेक्षाही केली नाही आणि न मिळाल्याचं वैषम्यही जवळपासही कधी भरकटलं नाही. निस्वार्थपणे जोडलेली माणसं मात्र जिवाला जीव देण्यासाठी सोबत आहेत. आणखी काय हवं.

Thursday, 7 April 2011

पुलं आणि भीमराव पांचाळे


कधीतरी आपणच आपल्या नकळत लिहिलेलं एखादं वाक्य आपल्यालाच आवडून जातं. ‘भीमराव पांचाळे या चार नि तीन सात शब्दांत गझल मराठीत गाते,’ हे वाक्य त्यातलंच. भीमरावांच्या मुलाखतीच्या इण्ट्रोची सुरुवात अशी लिहिली होती. मुलाखत स्मरणिकेसाठी होती. स्मरणिका भीमरावांच्या साठीच्या कार्यक्रमासाठी.

कार्यक्रम छानच झाला. रवींद्र नाट्यमंदिर संपूर्ण भरून गेलं होतं. खाली आणि गॅलरी संपूर्ण. पासेस आधीच संपले होते. त्यामुळे लोकांनी आत शिरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. खुर्च्या भरल्या होत्या. घरीही कधीच खाली बसली नसतील अशी माणसं बायकापोरांसकट जमिनीवर बसली होती. गर्दी जशी भरगच्च तशीच त्यांची दादही. भीमरावांची प्रत्येक जागा दाद घेत होती. अगदी त्यांचं सत्कार समारंभातलं हसणंही दाद घेत होतं. भीमरावांचं कौतूक सुरू झालं की ते अंग चोरून ऐकायचे. कुणी कौतूक केलं की ते कान पकडून तौबा करायचे. हे सारं छान होतं. अगदी सुगंधी.

Friday, 1 April 2011

आमदार झोपा काढत आहेत


पंधरा दिवस एक ईमेल सोडला तर इंटरनेटकडे बघितलंच नव्हतं. त्यामुळे जवळपास पंधरा दिवसांपूर्वी नवशक्तितल्या कॉलमात लिहिलेला कॉलम टाकायचा राहून गेला होता. लेखाचा विषय खरं तर आमदारांच्या झोपेवर होता. अनिल काकोडकरांच्या भाषणात अनेक आमदार डुलक्या काढताना टीव्हीवर बघितलं. त्याच्यावर लिहायला बसलो. हा कार्यक्रम वि. स. पागें अभ्यास केंद्राच्या उद्घाटनाचा होता म्हणून त्यांच्या भाषणांचा संग्रह वाचायला घेतला. रेफरन्ससाठी म्हणून पुस्तक हातात घेतलं पण बरंच पुस्तक वाचून काढलं. त्यातला बराचसा भाग आधीच वाचलेला होता. तो रिफ्रेश झाला. त्यानंतर लिहिलेल्या लेखावर वि. स. पागेच छा गये. मूळ विषय बाजूलाच राहिला. 

लेख नवशक्तित छापून आला. संध्याकाळी एका वयस्कर गृहस्थांचा फोन आला होता. बहुतेक कल्याणचे सामंत. ते पागेंचे दूरचे नातेवाईक. त्यांना पागेंवर कुणीतरी लिहिलं याचा खूप आनंद झाला. मलाही खूप आनंद झाला. पागेंसारखी सगळीच माणसं आपण आपली सगीसोयरीच मानतो.

Thursday, 17 March 2011

बडव्यांना बडवायलाच पायजे


इन्कम टॅक्सची धाड पडले की भलभले सरळ होतात. जयराज फाटकांसारख्यांचाही बुरखा टराटरा फाटतो. कलमाडी, ए. राजा, हसन अलीसारखे मोठे माशेही गळपटतात. पण या सगळ्यांपेक्षाही पंढरपूरच्या बडव्यांवर पडलेल्या इन्कम टॅक्सच्या धाडी धक्कादायक आहेत. या सगळ्या घपल्यांपेक्षा पंढरपूरच्या बडव्यांचा फ्रॉड मोठा आहे. आता या धाडींमुळे ते वठणीवर आलेत. त्यांनी म्हणजे बडवेसमाजानं मिटिंग घेऊन भाविकांकडून पैसे न मागण्याचा निर्णय घेतलाय. पण त्याचं काय खरं नाही.

माझं घर वारकरी स्वाध्यायी. देव्हा-यात विठ्ठल रखुमाईची फोल्डरची पितळी मूर्ती. आजीची कार्तिकी वारी. आजीनंतर ती आईपप्पांनी चालवली. त्यामुळे जातीचा, धर्माचा,  गावाचा, कुळाचा कुठलाच फारसा ठळक असा वारसा नसतानाही किमान सातआठशे वर्षांचा सलग धागा नाळेला चिटकून आलाय. आईच्या पोटात असल्यापासून याच्यावरच मन पोसलं गेलंय. कळत नसल्यापासून पंढरपूरला जातोय. जिथपासून पांडुरंगाला भेटतोय, तेव्हापासून बडवे माहित्येत.

बडवे कसे काठीने मारायचे. बडव्यांच्या घरी राहताना कसा त्रास सहन करावा लागयचा. अशा अनेक कहाण्या लहानपणापासून ऐकलेल्या. महाराष्ट्र टाइम्सने पहिला सांस्कृतिक विशेषांक काढला. बहुदा पाच वर्षांपूर्वीच्या गुढीपाडव्याला. जयंत पवारांनी त्याचं संपादन केलं होतं. आपण ज्यांच्यासोबत काम केलं असं अभिमानानं सांगावं इतका हा मोठा माणूस. त्यांनी काढलेला एक विषय बडव्यांवर होता. तो विषय माझ्याकडे आला. हायकोर्टाने बडव्यांना विठ्ठल मंदिरातून तडिपाराचा आदेश दिला होता. त्यासंदर्भात लिहायचं होतं.

दोन दिवस पंढरपूरला गेलो. सुनील दिवाण मटाचे पंढरपूरचे वार्ताहर. ते आणि त्यांचे मित्र डॉ. महेश कुलकर्णी हे दोन्ही दिवस सोबत होते. बरीच माहिती जमवली. सविस्तर लेख लिहिला. त्यातला बराच कापावा लागला. लेख छापून आला. अंकाची आधीपासून जोरदार हवा होती. अंक स्टॉलवर आल्या आल्या संपला. ब-याच मित्रांनी फोन करून कौतूक केलं. विशेषतः अभिजीत ताम्हणेंनी केलेलं कौतूक आठवतंय. ही डॉक्युमेंट्री फॉर्ममधे लिहिल्यासारखं वाटतंय, ते म्हणाले. मी बरीच वर्षं टीवीत काम केलेलं. त्याचा प्रभाव मलाच कळला. आजवर तशा बातम्याच प्रामुख्याने लिहिल्या होत्या. त्यामुळे लेखासाठी ओळख नव्हती. या लेखाने ती मिळाली.

Monday, 14 March 2011

या मारुतीचे बाप प्रबोधनकार!


प्रबोधनकारांवर लिहिण्यासाठी मी काहीना काही निमित्ताची वाटच बघत असतो. थोडा जरी चान्स मिळाला तरी सोडत नाही. कुठे कुठे भाषणाला बोलवतात, तेव्हा थोडीशी जरी जागा असेल तर प्रबोधनकार आपोआप घुसतातच. कारण एवढंच की हा डोंगराएवढा माणूस मला नेहमी आपला वाटत आलाय. कुठेच कुठल्या पठडीत अडकला नाही. प्रबोधनकारांच्या एकोणनव्वदाव्या वाढदिवसाला मोठा कार्यक्रम झाला होता. इतकी वर्षं झाली पण हा आंबा कधीच नसला नाही, धों. वि. देशपांडेंनी असं कौतूक केलं. बाळासाहेब कार्यक्रमाचं निवेदन करत होते. हा आंबा कधीच एकाच टोपलीत राहिला नाही, म्हणून नासला नाही, त्यांनी म्हटलं.

फक्त विचारधारेचंच नाही तर सगळं आयुष्यच ते विविध अंगांनी फुलून जगत राहिले. माडासारखं उंच वाढायचं की वटवृक्षासारखं बहरायचं, हे आपल्यालाच ठरवावं लागतं. प्रबोधनकारांसारखा शेकडो दिशांनी वाढलेला वटवृक्ष माझ्या परिचयाचा दुसरा नाही. प्रबोधनकारांवरची वेबसाईट prabodhankar.com बनवताना हा वटवृक्ष जवळून बघायची संधी मिळाली. त्याच्या पारंब्यांवर मनसोक्त हिंदकळलोही. पण तरीही हा माणूस फारसा काही कळलेला नाही. साईटचं अजून खूप काम उरलंय. सुरू आहे. लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर प्रबोधनकारांविषयी आणखी नवे प्रोजेक्टही हाती घ्यायचेत.

Friday, 11 March 2011

जनगणना की उद्याच्या शोषणाची तयारी?


जनगणनेतून नवे आकडे समोर येणार आहेत. वाढलेली गरिबी, वाढलेली बेकारी पाहून सरकारी यंत्रणेच्या मनातल्या मनात गुदगुल्या होणार आहेत. त्यातून भ्रष्टाचारातल्या टक्केवारीचे वाढलेले आकडे त्यांच्या डोळ्यासमोर नाचणार आहेत. उद्याच्या नव्या शोषणाची तयारी मोठ्या उत्साहाने सुरू आहे. त्या उत्साहात भर घालण्यासाठी आपणही बेघरांच्या जनगणनेचे फोटो पाहून आपण खूश होणं अत्यावश्यक नाही का

हा इण्ट्रो होता, गेल्या शनिवारी नवशक्तितल्या माझ्या कॉलमात छापून आलेल्ला लेखाचा. बेघरांच्या फूटपाथांवर सुरु असलेल्या जनगणनेचे नाईट मोडमधले फोटो बघितले. या विषयावर लिहायचं ठरवलं. गुगलवर सर्च करून, ही जनगणना कऱणा-यांशी बोलून माहिती मिळवली. बरीच आकडेवारी जमा केली. पण प्रत्यक्षात लिहायला बसल्यावर त्यापैकी काहीच वापरलं नाही. जे जे वाटत होतं, ते सरळ लिहित गेलो. आकडे बाजूलाच राहिले. उगाच काहितरी मनातलं कागदावर उतरलं. सगळं मलाच अनपेक्षित होतं. चांगलं झालंय की वाईट मला माहीत नाही. उगाच खूप निगेटिव झालंय का, माहीत नाही.

Thursday, 10 March 2011

मनसे रे!


काल संध्याकाळपासून आपल्या या ब्लॉगचा टीआरपी तेजीत आहे. ठाकरे या नावाला ती क्रेझ आहेच. म्हणूनच राज ठाकरेंचा नवा पक्ष आला, येणार होता, नवा होता, राडा करत होता. तेव्हा आम्ही मीडियावाल्यांनी त्यात पोटभर हात धुवून घेतले. जणू आकाशातून कुणी देवदूत आलाय आणि तो जग बदलवून टाकणार आहे, अशा थाटात मोठमोठे विचारवंत म्हणवले जाणारे ज्येष्ठ पत्रकार लिहित, बोलत, वावरत होते.

मनसे घडत असताना या सगळ्यात काहीच दम नाहीय, हे माझ्यासाऱख्या छोट्या पत्रकारालाही कळत होतं. तर मोठमोठ्यांना नक्की कळत असणार. तरीही शिसारी येईपर्यंत राज यांचं गुणगाण सुरू होतं. राजसत्ता, राज माझा, राज काळ अशी पेपर आणि चॅनलांची नावं बदलल्यात जमा होती. विशेष म्हणजे मटाची सोनिया टाइम्स आणि जय महाराष्ट्र टाइम्स अशी यापूर्वी हेटाळणी करणारे त्याकाळात शांत होते. उलट लाळघोटेपणा करण्यात आघाडीवर होते. राज शब्दांच्या बुडबुड्यावर स्वप्न विकत आहेत, हे त्या सगळ्यांना निश्चित कळत असणारच. पण तरीही कुणी बोलत नव्हतं, लिहित नव्हतं.

Wednesday, 9 March 2011

टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह


वसंत म्हणून माझा एक मित्र आहे. साधा इंजिनियर. त्याने माझं लिखाण वाचलं असेल असं मला कधी वाटलंही नव्हतं. आता तसा आमचा संपर्कही नव्हता. माझ्याकडे त्याचा नंबरही नव्हता. आजही नाही. पण गेल्या महिन्यात त्याचा फोन आला. म्हणाला आज तारिख काय आहे माहित्येय. मी कामात होतो. म्हटलं काहीतरी वात्रटपणा असणार. पण मित्र एवढ्या दिवसांनी बोलतोय म्हणून उत्तर दिलं. नऊ फेब्रुवारी. त्याने वाक्य पूर्ण केलं दोन हजार अकरा. आजची तारिख म्हणजे नौ दो ग्यारा. अशी तारिख हजार वर्षांनी पुन्हा येईल. मी फोनदेखलं हसून हो म्हटलं. ही तारिख वाचून मला तुझी आठवण झाली, तो म्हणाला माझी ट्यूब काही पेटली नाही. तू ती बातमी लिहिली होतीस ना नौ दो ग्यारा. राज उद्धववर.

इतका वेळ तो जे बोलत होता त्याचा मला आता साक्षात्कार झाला. बातमी नाही, माझा लेख होता तो विंडो सीट कॉलमातला, टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह. उद्धव आणि राज वेगळे असले तरी त्यांना आज ना उद्या एकत्र यावं लागणार, असं माझं लॉजिक मी त्यात मांडलं होतं. हा निव्वळ हायपोथिसिस आहे. कुणाला मान्य होईल, कुणाला नाही. आपल्याला काय दोन्ही प्रतिक्रिया मान्य.

एका पाच वर्षं जुन्या बातमीची बातमी


आज त्याला पाच वर्षं झाली. तो नऊ मार्च मला चांगलाच आठवतोय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या मोठ्या हॉलमधे राज ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स होती. त्यात मनसेचा झेंडा प्रकट झाला आणि नावही. तेव्हा शिवराजसेना वगैरे नाव चर्चेत होती. पण हे गृहनिर्माण सोसायटीसारखं वाटणारं नाव अजब वाटलं होतं. पण पुढे मनसे या त्याच्या तुकड्याने मजा आणली.  

राज ठाकरेंनी नऊचा मुहूर्त पुन्हा पाळला होता. ९ मार्च. त्याआधी आणि त्यानंतरची त्यांची प्रत्येक महत्त्वाची गोष्ट त्यांनी नऊचा मुहूर्त धरून केली. त्यावर मी नऊनिर्माण अशी बातमीही केली होती. ती गाजलीही. त्यातलं एक वाक्य कापण्यात आलं होतं, ते होतं, प्रबोधनकारांच्या नातवाने हे करावं हे आश्चर्यच!

Thursday, 3 March 2011

इम्प्लिमेण्टिंग मराठी बाणा


एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन. त्यादिवशी माझा मित्र शैलेश निपुणगेचा वाढदिवस असतो. कॉलेजात असताना त्याला जागतिक एड्स दिनाच्या शुभेच्छा असं लिहिलेलं ग्रिटिंग दिलं होतं. त्यामुळे हा एक दिवस सोडला, तर बाकीचे असे जागतिक वगैरे दिनही लक्षात नसतात आणि कुणाच्या वाढदिवसाच्या तारखाही.

आता लग्न झाल्यामुळे बायकोचा, मुलाचा आणि लग्नाचा वाढदिवस वगैरे लक्षात ठेवावा लागतो. बाकी स्वतःचा वाढदिवसही लक्षात नाही, अशीही वर्षं गेली. तारखा किंवा एकूणच आकड्यांशी आपला आकडा तसा छत्तीसचाच. त्यामुळे विशेष दिवसांचं वगैरे कौतूक असायचा प्रश्नच नाही. आता मराठी भाषा दिनाचंही तसंच. मला वाटतं मराठी बाणा जपण्यासाठी आपण कोणत्याही दिवशी थोडसं जरी पाऊल उचललं, तर तो आपल्यासाठी मराठी भाषा दिनच.

Monday, 28 February 2011

सामाजिक कार्यकर्ते आहेत तरी कुठे ?


आजचा लेख वाचलाय का तुम्ही, शनिवारी रात्री घरी परतल्यावर बायकोनं विचारलं.
आता लग्नाला सात वर्षं झालीत. त्यामुळे या प्रश्नाचा अर्थ मुक्ताला लेख आवडला नाही
असा ऐकणं स्वाभाविक होतं.
का आवडला नाही लेख, मी विचारलं.
अहो, हे पुस्तकाचं परीक्षण वाटलं, म्हणून विचारलं, ती म्हणाली. लेखाचं हेडिंग वेगळं आणि लेखात मात्र भलतंच, हे तिला खटकलं होतं.
बरोबर आहे गं, गेले चार पाच दिवस चंदूभाऊंच्या पुस्तकाशिवाय दुसरं डोक्यात काही नाही, म्हणून त्यावरच लिहिलं, मी म्हणालो. चार दिवस आधी लोकप्रभेत परीक्षण लिहिलं होतं. आता आणखी काय लिहायचं, म्हणून हे लिहिलं. या उत्तरावर तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं.

Saturday, 26 February 2011

यात माणूस बदलायची ताकद आहे


चंद्रकांत वानखडेंच्या दोन्ही पुस्तकांवर परीक्षणं मी लिहिलित. त्याचा मला अभिमान आणि त्यापेक्षाही जास्त आनंद आहे. आपुला चि वाद आपणासी चं परीक्षण गेल्या आठवड्यात लोकप्रभेत छापून आलं होतं. पण खरं तर ही परीक्षणं किंवा समीक्षा नाही. ही या पुस्तकांची मला भावलेली ओळख आहे. कारण असं स्वतःपासून अलिप्त ठेवून मी ही दोन्ही पुस्तकं नाही वाचू शकलो. आपुलाचिने तर खूपच अस्वस्थ झालो होतो. अमरजींकडे सांगितलेली माझी पहिली प्रतिक्रिया होती, हे पुस्तक वाचण्याचीही आपली लायकी नाही.

सोमवारी चंदूभाऊंची प्रकट मुलाखत होतेय. प्रतिमाताईंसारखं तोलामोलाचं व्यक्तिमत्त्व ही मुलाखत घेतंय. रवी बापट बोलणार आहेत. हा कार्यक्रम जबरदस्त होईलसं वाटतंय. चंदूभाऊना ऐकणं हा मुंबईकरांसाठीचा दुर्मीळ योग आहे. आपण सगळ्यांनी साधायलाच हवा तो.
कुठेः रवींद्र नाट्यमंदिराचं मिनी थिएटर, प्रभादेवी.  
कधीः २८ फेब्रुवारी २०११, संध्याकाळी ६.३० वाजता

चंदूभाऊंच्या एका साध्या सत्यासाठी!


मुंबईत रवींद्र नाट्यमंदिराच्या मिनी थिएटरमधे चंदूभाऊंची मुलाखत आहे. प्रतिमाताई जोशी मुलाखत घेणार आहेत. डॉ. रवी बापट पुस्तकावर बोलणार आहेत. २८ फेब्रुवारी संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आहे. चंदूभाऊंना ऐकणं ही खरंच पर्वणी आहे. तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाचं माझ्याकडून निमंत्रण. या, आम्ही आपली वाट बघतोय.